तूर, मूग, उडीदच्या आयातीवर निर्बंध, डाळींचे भाव वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:01 AM2019-04-10T01:01:07+5:302019-04-10T01:02:48+5:30
शेतकऱ्यांना कच्च्या मालाची जास्त किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध १ एप्रिलपासून पुन्हा एक वर्षांसाठी वाढवून पूर्वीप्रमाणे कोटा पद्धती आणली आहे. त्यामुळे विदेशातून कच्च्या मालाची आयात ७० ते ८० टक्के कमी होणार असून यंदाच्या हंगामात सर्व डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीची झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. आठ दिवसांत किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या तूर डाळीचे दर प्रति किलो ८५ रुपयांवर पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांना कच्च्या मालाची जास्त किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध १ एप्रिलपासून पुन्हा एक वर्षांसाठी वाढवून पूर्वीप्रमाणे कोटा पद्धती आणली आहे. त्यामुळे विदेशातून कच्च्या मालाची आयात ७० ते ८० टक्के कमी होणार असून यंदाच्या हंगामात सर्व डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीची झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. आठ दिवसांत किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या तूर डाळीचे दर प्रति किलो ८५ रुपयांवर पोहोचले आहेत.
कोट्यामुळे मिळणार अपुरा साठा
सरकारने कडधान्याच्या कच्च्या मालावर निर्बंध आणले, पण दाल मिलला कच्चा माल मिळावा म्हणून कोटा पद्धती आणली. सरकार २ लाख टन तूर, १.५० लाख टन उडद आणि १.५ लाख टन मूग आयात करणार आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या एकत्रित मागणीनुसार सरकार प्रत्येकाला ठराविक कच्चा माल देणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे कडधान्याच्या कच्च्या मालाचे भाव वाढले आहे. पण शेतकऱ्यांनाही कच्च्या मालाला चांगला भाव मिळत आहे.
कंपन्या खरेदी करताहेत तूर
देशातील मोठ्या कंपन्यांनीही पॅकिंगमध्ये डाळ विक्री सुरू केली आहे. या कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून जास्त भावात तूर खरेदी करीत असल्यामुळे स्थानिक दाल मिलला मुबलक तूर मिळणे कठीण झाले असून जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. सरकारने आयातीवर निर्बंध टाकल्यामुळे मोठ्या कंपन्या आयातमुक्त अफ्रिकन देशातून कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणात करीत आहे. स्पर्धेत दाल मील चालविणे कठीण झाल्याचे दाल मील संचालक बळवंत अग्रवाल यांनी सांगितले.
आयातीचे प्रमाण घटले
कडधान्याच्या कच्च्या मालाची सर्वाधिक आयात म्यानमार येथून होते. एक वर्षापूर्वी भारतात १० लाख टन तूर, ६ ते ७ लाख टन मूग आणि ७ ते ८ लाख टन उडीद, ऑस्ट्रेलियातून १० ते १२ लाख टन चणा आणि कॅनडातून २० ते २२ लाख टन वाटाणा आयात व्हायचा. पण आता निर्बंधानंतर आयात १५ ते २० टक्क्यांवर आली आहे.
सरकारकडे तुरीचा साठा
दोन वर्षांपूर्वी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून सरकारने तुरीची खरेदी केली. ही खरेदी गेल्यावर्षीही सुरू होती. त्यामुळे सरकारकडे तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आयातीवर निर्बंध आणल्यानंतर यावर्षी सरकार तूर दाल मीलला देणार आहे. ही प्रक्रिया लवकर व सुलभ झाली तर तूर डाळीचे भाव आटोक्यात राहतील, असे अग्रवाल यांनी सांगितले.
१०० दाल मील बंद
नागपुरात पाच वर्षांपूर्वी २०० पेक्षा जास्त दाल मील होत्या. पुरेसा कच्चा माल आणि दोन वर्षांपासून तूर डाळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे १०० पेक्षा जास्त दाल मील बंद पडल्या आहे. शिवाय आयातीला थेट परवानगी नसल्यामुळे कच्चा माल मिळणे कठीण झाले आहे. नंतरच्या काळात किती दाल मील सुरू राहतील, हे सांगणे कठीण असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
तूर डाळींचे दर वाढणार
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पावसामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. शिवाय सरकारने आयातीवर निर्बंध आणून कोटा पद्धती जारी केली आहे. त्यामुळे दाल मीलला हव्या त्या प्रमाणात तूर मिळणार नाही. आफ्रिकन देशातून तूर, मूग आणि उडदाच्या आयातीला परवानगी दिली आहे. पण या ठिकाणाहून आयात महाग पडते. निश्चित कोट्यामुळे दाल मीलला सरकारकडे मागणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुरीचे दर वाढतील. दाल मीलला क्षमतेच्या तुलनेत कमी तूर मिळाल्यामुळे डाळीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बळवंत अग्रवाल, अध्यक्ष,
विदर्भ दाल मील असोसिएशन.