तूर डाळीचे भाव घसरणार
By admin | Published: April 7, 2015 02:21 AM2015-04-07T02:21:29+5:302015-04-07T02:21:29+5:30
अवकाळी पावसामुळे तुरीचे पीक खराब झाल्याचा कांगावा करून दालमिल मालकांनी तूर डाळीची किंमत अव्वाच्या सव्वा वाढविली
कृत्रिम दरवाढीवर नियंत्रण हवे : ग्राहकांच्या मानसिकतेचा व्यापाऱ्यांना फायदा
मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूर
अवकाळी पावसामुळे तुरीचे पीक खराब झाल्याचा कांगावा करून दालमिल मालकांनी तूर डाळीची किंमत अव्वाच्या सव्वा वाढविली आहे. त्याचा फटका गरीब आणि सर्वसामान्यांना बसत असून त्यांच्या थाळीतून डाळ गायब झाली आहे. कृत्रिम दरवाढीवर शासनाचे नियंत्रण असावे, अशी मागणी पुढे आली आहे.
गेल्यावर्षी खुल्या बाजारात तूर डाळ दर्जानुसार ६२०० ते ६८०० रुपये क्विंटल होती. यावर्षी मिलमधूनच ८५०० ते ९००० रुपये क्विंटल दराने विक्री सुरू आहे. अर्थात यावर्षी २२०० रुपयांनी दर वाढले आहेत. तुलनात्मकरीत्या तुरीच्या किमतीत गेल्यावर्षीच्या ३५०० ते ४५०० रुपयांच्या तुलनेत हजाराची वाढ होऊन उत्कृष्ट तूर ५००० ते ५५०० रुपयांत विक्रीस आहे. तूर डाळीच्या प्रचंड दरवाढीने ग्राहक अचंबित झाले आहेत. ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार केल्यास वस्तू महाग झाल्यास खरेदीकडे ग्राहकांचा जास्त ओढा असतो. दरवाढीआधीच ती वस्तू खरेदी करावी, यावर ग्राहकांचा भर असतो. हे समीकरण अनेकदा घडल्याचे दिसून येते. ही बाब आता तूर डाळीच्या बाबतीत घडत आहे. आंब्याची आवक वाढल्यानंतर तूर डाळीचे दर हमखास ७५ ते ७८ रुपयांपर्यंत खाली उतरतील. त्यामुळे ग्राहकांनी वाढीव दरात डाळ खरेदी करू नये, असे आवाहन धान्य बाजारातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
वार्षिक साठवणुकीकडे ओढा
महाराष्ट्रात वार्षिक धान्य साठवणुकीकडे लोकांचा ओढा जास्त असतो. गहू, तांदूळ, चणा डाळ आणि तूर डाळीची ते साठवण करतात. गहू व तांदूळ स्वस्त असल्याने यावर्षी लोकांनी या धान्याच्या खरेदीला फारसे महत्त्व दिले नाही. पण महागाईच्या वृत्तानंतर तूर डाळीच्या खरेदीकडे लोकांचा अधिक ओढा दिसून येत आहे. त्याचाच फायदा मिलमालक आणि काही व्यापारी घेत असल्याचा आरोप धान्य व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला.
सर्व दालमिलमध्ये समान दर!
नागपुरातील जवळपास २५० दालमिलमध्ये दर्जानुसार तूर डाळीचे दर समान आहेत.
दरदिवशी दर किती वाढवायचे, यासंदर्भात मिलमालक एकत्रितरीत्या निर्णय घेत असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे पूर्वीचा कमी दरातील तुरीचा साठा असो वा नव्याने खरेदी केलेली तूर, एकत्रित निर्णयामुळे बाजारात १०० रुपयांपर्यंत डाळीचे दर जाण्याचे वृत्त पसविले जात असल्यामुळे ग्राहक डाळीच्या खरेदीला जास्त प्राधान्य देत आहेत. १५ ते २० दिवसांत तूर डाळीची प्रति क्विंटल किंमत हजाराने वाढली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, १०० किलो तुरीपासून जवळपास ७५ किलो उत्कृष्ट आणि उर्वरित मध्यम व हलक्या दर्जाची डाळ तयार होते. अशा स्थितीत त्यांना तोटा कुठे होतो, असा प्रश्न ग्राहकच नव्हे तर व्यापाऱ्यांनाही पडला आहे.
तुरीची आयात वाढली
सध्या बर्मा येथून चांगल्या दर्जाच्या तुरीची आयात वाढली असून मुंबई पोर्टवरून नागपुरात येत आहे. ४५०० ते ५००० रुपये भाव आहेत. धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले की, कळमना बाजारात जानेवारीपासून तुरीची आवक सुरू झाली. फेब्रुवारीमध्ये प्रचंड वाढ झाली. मिलमालकांनी तेव्हापासूनच खरेदी केली. शिवाय मार्चमध्येही तुरीचा साठा केला. पण मार्चमध्ये अवकाळी पावसाचे निमित्त झाले आणि तूर डाळीच्या किमती वाढू लागल्या. सध्या कळमना बाजारात तुरीचे सौदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. एप्रिल महिन्यात आवक वाढण्याची अपेक्षा आहे. परिणामी तूर डाळीच्या किमतीत कमी होतील, असे मत काही धान्य व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ३००० ते ३२०० रुपये क्विंटल दराने व्यापारी तुरीची खरेदी करीत आहेत. तर दुसरीकडे तूर डाळीचा दर नऊ हजारांवर पोहोचला आहे. पूर्वी तुरीला ४००० ते ४५०० रुपये भाव मिळायचा. अलीकडे तुरीचा पेरा कमी झाला, शिवाय पीक कमी झाले. शेतकऱ्यांना पैसा हवा आहे म्हणून व्यापारी कमी दरात खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. मध्यंतरी पावसामुळे तूर ओली झाली. त्याचाही फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. दालमिल मालक आणि व्यापारी साखळी बनवून शेतकरी आणि ग्राहकांची पिळवणूक करीत आहेत.
-सुनील शिंदे,
माजी आमदार व शेतकरी नेते.