नागपूर विमानतळावर पहिल्यांदा लागणार प्राथमिक रडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 12:57 PM2022-02-14T12:57:01+5:302022-02-14T13:01:44+5:30
प्राथमिक रडारमुळे नागपूर एटीसी परिसरातून जाणाऱ्या विमानांना योग्य माहिती मिळेल.
वसीम कुरैशी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्यांदा प्राथमिक रडार लावण्यात येणार आहे. याशिवाय विमानांवर नियंत्रण ठेवणारे सेकंडरी रडारसुद्धा बदलण्यात येत आहे. त्यामुळे विमानतळावरील रडार जास्त सक्षम होईल. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवीन व्हाईस कम्युनिकेशन स्वीचिंग यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीने काम करण्याची सुविधा मिळेल.
नवीन प्राथमिक रडार आकाशात नियंत्रण परिसरात हवेतील कोणत्याही धातूची माहिती तातडीने देईल. वाहतूक नियंत्रण कक्षात एवढी आधुनिक यंत्रणा भोपाळ, रायपूर, इंदूर, जबलपूर विमानतळावरही नाही. नवीन उपकरणांमुळे नागपूर विमानतळाचे एटीसी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबादच्या समकक्ष होईल. नागपूरसह अत्याधुनिक रडार वाराणसी व लखनौमध्ये स्थापन होणार आहे. नागपूर एटीसी इंटिग्रेटेड रडार असून जगात सर्वोत्तम यंत्रणेत सहभागी आहे.
असे होणार फायदे :
- कोणत्याही विमानाला थेट मार्ग देणे सुलभ होईल.
- त्यामुळे विमानाचे इंधन वाचेल आणि आकाशात कार्बनचे उत्सर्जन कमी होईल.
- विदेशी उड्डाणे नागपूर एटीसी परिसरातून जाण्यास इच्छुक असतील.
- विमानतळावर प्राधिकरणाचे उत्पन्न वाढेल.
सक्षमता आणि सुविधा वाढणार
प्राथमिक रडारमुळे नागपूर एटीसी परिसरातून जाणाऱ्या विमानांना योग्य माहिती मिळेल. जास्त संख्येत टेलिफोन ठेवण्याऐवजी व्हाईस कम्युनिकेशन स्वीचिंग यंत्रणा या सेवेला एकाच उपकरणात उपलब्ध करून देईल. त्यामुळे सक्षमता व सुविधा वाढेल.
रोशन कांबळे, सह-समन्वयक प्रमुख, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागपूर विमानतळ.