सरकारविरोधात प्राथमिक शिक्षक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:19 AM2017-11-05T00:19:55+5:302017-11-05T00:20:09+5:30
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हाला फक्त शिकवू द्या, असा आग्रह शिक्षकांनी प्रशासनाकडे केला.
गेल्या सात ते आठ महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्यांचा विषय राज्यभर गाजत आहे. दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यातच होतात आणि जि.प.चे कर्मचारी व शिक्षक यांच्या बदल्या एकाच शासन निर्णयानुसार होतात. परंतु यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्या स्वतंत्र शासन निर्णयानुसार आणि आॅनलाईन पद्धतीने करण्याचे राज्य सरकारने ठरवले. सात आठ महीने उलटूनही बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान या बदली धोरणात काही दुरुस्ती कराव्यात या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. सरकार काहीही ऐकायला तयार नाही.
दुसरीकडे मागील चार पाच वर्षापासून शिक्षकांच्या मागे आॅनलाईन कामाचा ससेमिरा सुरू आहे. शाळेत कोणत्याही साधनसुविधा नसताना अनेक अशैक्षणिक स्वरूपाची कामे आॅनलाईन पद्धतीने शिक्षकांना करावी लागतात.
ही कामे शिक्षकांकडून करणे थांबवावे व ती कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावी या मागणीसाठी मागील काही दिवसापासून राज्यभर शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्यातच वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी बाबत जाचक अटी असलेला शासन निर्णय शासनाने निर्गमित केला त्यामुळे शिक्षकांमधील असंतोष अधिकच वाढला.
हा असंतोष आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी १ वाजता यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहचला. त्या ठिकाणी झालेल्या सभेत शिक्षक नेत्यांची जोरदार भाषणे झाली.
मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केले. यात सुनील पेटकर, सुनील पाटील, तुषार अंजनकर, राजकुमार वैद्य, शरद भांडारकर, शेषराव कांबळे, स्वाती लोन्हारे, मनोज घोडके, सुधाकर मते आदी वेगवेगळ्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी शासनाने जर मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच संकलित चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.