भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या मुलांनी तयार केलेल्या पेनचे पंतप्रधानांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:40 AM2018-04-11T00:40:33+5:302018-04-11T00:40:46+5:30
पवनीच्या मुलांनी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक पेन तयार केला आहे. या संशोधनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. सध्या हा पेन देशातील २२ राज्यात वापरला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पवनीच्या मुलांनी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक पेन तयार केला आहे. या संशोधनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. सध्या हा पेन देशातील २२ राज्यात वापरला जात आहे.
२०१७ मधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट पुरस्कार मिळविणाऱ्या पवनी (भंडारा) येथील पवन पब्लिक स्कूलची १३ वर्षीय विद्यार्थिनी विधी एलसट्टीवार हिने पर्यावरणपूरक पेनच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या ३ एप्रिल रोजी संसद भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पेन भेट देण्यात आला. मोदी यांनी हा पेन वापरून या पर्यावरणपूरक संशोधनाची प्रशंसा केली.
नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने राष्ट्रपती भवन येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट पुरस्कारासाठी स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत ‘देशात प्लास्टिकचा वापर कसा कमी करायचा’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हरियाणा येथील एका विद्यार्थिनीने यासाठी प्लास्टिक पेनाचा वापर थांबवायला हवा अशी भूमिका मांडली. त्यानंतर विधी एलसट्टीवारने वर्तमानपत्राच्या कागदापासून पेन तयार करून दिला. पेनच्या झाकणात तुळशीचे बियाणे टाकले. उपयोग करून पेन जमिनीवर फेकून दिल्यास तुळशीची रोपे तयार व्हावीत हा त्यामागे उद्देश होता. या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला व शाळेच्या विद्यार्थ्यांना पाच हजार पेन तयार करून मागण्यात आले. त्याचवेळी पेनपासून मिळणाºया उत्पन्नाचा गरजूंसाठी उपयोग करण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात आला. त्यांनी या उत्पन्नातून शाळेची इमारत बांधण्याचाही निश्चय केला.
पर्यावरणपूरक पेन तयार करण्यासाठी गरजू महिलांची सेवा घेतली जात आहे. दोन महिलांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सध्या २६ महिला कार्यरत आहेत. त्यातून महिला ६ ते ७ हजार रुपये मासिक उत्पन्न मिळवून घर सांभाळत आहेत. त्यांनी मुलांना शाळेत टाकले आहे. या पेनमुळे शाळेच्या बांधकामासाठी गेल्या तीन महिन्यांत ५.३२ लाख रुपये मिळाले आहेत. रिसर्च फॉर रिसर्जंस फाऊंडेशन या पेनसाठी बायोडिग्रेडेबल रिफिल तयार करण्याचे संशोधन करीत आहे. ते संशोधन यशस्वी झाल्यास हा पेन १०० टक्के पर्यावरणपूरक होईल. पंतप्रधानांना भेटलेल्या प्रतिनिधी मंडळात शाळेच्या संचालिका वृंदन बावणकर, डॉ. सोनू जेसवानी, डॉ. रेणू बाली, डॉ. इला शुक्ला, डॉ. हंसा शुक्ला व मृणाल दुधे यांचा समावेश होता.