नागपुरातील अॅग्रोव्हिजनच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 07:37 PM2018-07-28T19:37:14+5:302018-07-28T19:40:55+5:30
विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून, ते दीड लाख शेतकऱ्यांना येथे मार्गदर्शन करतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून, ते दीड लाख शेतकऱ्यांना येथे मार्गदर्शन करतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गडकरी म्हणाले, यंदाचे १० वे अॅग्रोव्हिजन आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्रिपुराचे मुख्यमंत्री व आसामचे मुख्यंमंत्री... यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अॅग्रोव्हिजनमध्ये उत्पादन तंत्रज्ञान, शेतपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बाजार सुविधा यावर कार्यशाळा होतील. दुग्धव्यवसाय, बांबू लागवड, व्यापारी संधी आणि ऊस उत्पादन या विषयांवर एकदिवसीय परिषद होईल. भारतातील शेतीविषयक उत्पादने करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग, विविध राज्ये व कृषी विद्यापीठे प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान सादर करणार आहेत. पशु प्रदर्शनही आयोजित केले जाईल. तीन उत्कृष्ट जनावरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. पशुपालन, दुग्धव्यवसाय या विषयांवर मार्गदर्शनपर प्रशिक्षण दिले जाईल.
विद्यार्थ्यांसाठी कृषी मंथन स्पर्धा होईल. इनोव्हेशन व स्टार्टअपची प्रदर्शनात मांडणी केली जाईल. उत्कृष्ट व उपयुक्त संशोधनाची राज्य पातळीवर निवड करून, त्यास व्यावसायिक रूपांतरणासाठी तांत्रिक सहकार्य पुरविले जाणार आहे. गेल्या दहा वर्षांत विदर्भातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया शेतकऱ्यांचा अॅग्रोव्हिजन अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, अॅग्रोव्हिजन सल्लागर समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, गिरीश गांधी, रवी बोरटकर, रमेश मानकर, माजी आ. आशिष जैस्वाल आदी उपस्थित होते.