पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे उद्घाटन?

By नरेश डोंगरे | Published: January 12, 2024 12:01 AM2024-01-12T00:01:50+5:302024-01-12T00:02:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: यवतमाळ किंवा वर्धा येथे हजर राहून या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करू शकतात.

Prime Minister Modi will inaugurate the Wardha-Yavatmal-Nanded railway line? | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे उद्घाटन?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे उद्घाटन?

नागपूर : विदर्भ-मराठवाड्यातील लाखो नागरिकांची टोकाला पोहोचलेली उत्सुकता आता संपुष्टात येणार आहे. होय, बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या पूर्ण झालेल्या टप्प्यात प्रवाशांना घेऊन लवकरच रेल्वेगाडी धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: यवतमाळ किंवा वर्धा येथे हजर राहून या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करू शकतात. त्याचमुळे शुक्रवारी १२ जानेवारीला होऊ घातलेला उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८४.६५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गावर १९१० कोटी, ७ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला असून त्यातून वर्धा रेल्वेस्थानकापासून देवळी, भिडी आणि कळंब या रेल्वेस्थानकापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. सिग्नल आणि इतर अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात आलेल्या या मार्गावर २३ डिसेंबर २०२३ ला ताशी १२५ किलोमीटर वेगाने गाडी चालवून देवळी ते कळंबपर्यंतची ट्रायलही घेण्यात आली. त्यानंतरच्या छोट्या मोठ्या कामांना पूर्णत्व दिल्यानंतर वर्धा-यवतमाळ या दोन जिल्ह्यांना जोडणारा 'लोह सेतू' नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी १२ जानेवारी २०२४ चा दिवस रेल्वे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला होता. मात्र, वेगवेगळ्या घडामोडीचा 'दिल्ली'तून आढावा घेण्यात आला. 

यापार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढच्या दोन आठवड्यांनंतर यवतमाळ जिल्ह्यात दाैरा होऊ शकतो. त्यामुळे या रेल्वेमार्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होण्याची दाट शक्यता असल्याने १२ जानेवारीच्या उद्घाटन सोहळ्याला पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. या संबंधाने शीर्षस्थ रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा झाली नसल्याचे सांगून 'ऑफ द रेकॉर्ड' या वृत्ताला दुजोरा दिला. तर, वर्धा येथील खासदार रामदास तडस यांनी 'मोदी साहेब या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत'. परंतु अद्याप अधिकृत दौरा आणि तारीख ठरली नसल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या रेल्वेमार्गाचे उद्घाटन व्हावे म्हणून आपण प्रयत्न करीत असल्याचेही खासदार तडस यांनी 'लोकमत'ला सांगितले.

स्वप्नपूर्तीसाठी अविरत प्रयत्न
लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकार आणि मुंबई दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांशी निरंतर संपर्क ठेवला. डॉ. दर्डा यांच्या प्रयत्नामुळेच राज्य सरकारने या प्रकल्पासाठी स्पेशल वॉर रूम तयार केली. या कामात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष सूचना दिल्यात. निधीही तातडीने उपलब्ध करून दिला. त्याचमुळे या प्रकल्पाला गती मिळाली आणि आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे.

Web Title: Prime Minister Modi will inaugurate the Wardha-Yavatmal-Nanded railway line?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.