पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार
By नरेश डोंगरे | Published: March 10, 2024 11:22 PM2024-03-10T23:22:14+5:302024-03-10T23:23:25+5:30
विदर्भातील बडनेराला वॅगन दुरूस्ती कार्यशाळा : अकोल्याला रेस्टॉरंट आणि नागभिडला जन औषधी केंद्र.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी, १२ मार्चला रेल्वेशी संबंधित विदर्भातील बडनेरा, अकोला आणि नागभिडमधील विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे.
विशेष म्हणजे, २६ फेब्रुवारीला पंतप्रधानांनी विदर्भातील रेल्वेच्या अनेक विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर २८ फेब्रुवारीला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविला होता.
यावेळी १२ मार्चला पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण करणार आहेत. याचवेळी ते वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या १० दे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांकडून ज्या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे, त्यात विदर्भातील बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कार्यशाळेचे, अकोला येथील रेल कोच रेस्टॉरेंटचे आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा)येथील जन औषधी केंद्रांच्या उद्घाटन समारंभाचाही समावेश आहे. या कार्यक्रमाच्या संबंधाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे.