पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूरसह विविध रेल्वे स्थानकावर 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट'चे उद्घाटन
By नरेश डोंगरे | Published: March 12, 2024 09:15 PM2024-03-12T21:15:26+5:302024-03-12T21:15:45+5:30
विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांचा शुभारंभ : ऑनलाइन पद्धतीने जनऔषधी केंद्राचेही लोकार्पण
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी, १२ मार्च रोजी नागपूरसह विविध रेल्वेस्थानकांवर ओएसओपी (वन स्टेशन वन प्रॉडक्ट) स्टॉलचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी बडनेरा, अकोला आणि नागभीडसह अन्य तीन ठिकाणी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन (व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून) पार पडले.
पंतप्रधान मोदी यांनी आज मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशभरात ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे ऑनलाइन उद्घाटन, लोकार्पण केले त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानक, पांढुर्णा, पुलगाव, बल्लारशाह, मुलताई, बैतूल रेल्वेस्थानकांवर स्थानिक उत्पादकांना ग्राहक मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ओएसओपी स्टॉलचे उद्घाटन, बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, अकोला येथील रेल कोच रेस्टॉरंट आणि नागभीड (जि. चंद्रपूर) येथील जनऔषधी केंद्राचे उद्घाटन पार पडले. त्याचप्रमाणे मुकुटबन स्थानकावर गती शक्ती कार्गो टर्मिनलचे आणि राजूर स्थानकावर राजूर गुडस् शेडचे लोकार्पण करण्यात आले. खापरी, सेवाग्राम आणि तिगाव स्थानकावर थर्ड आणि फोर्थ लाइनच्या लोकार्पणाचा कार्यक्रमही पार पडला.
पंतप्रधान मोदी यांनी अशाच प्रकारे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (दपूम) अंतर्गत येणाऱ्या कळमना-राजनांदगाव दरम्यानच्या कन्हान ते धनाैली सालवा, गुदमापर्यंतच्या तिसऱ्या रेल्वे लाइनचे लोकार्पण केले. १७ स्थानकांवर ओएसओपी स्टॉल, तीन नवीन गुडस् शेड, दोन जन औषधी केंद्रे आणि गती शक्ती कार्गोचेही लोकार्पण केले.
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची उपस्थिती
सेवाग्राम स्थानकावर खासदार रामदास तडस, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकावर खासदार कृपाल तुमाणे बैतूल रेल्वे स्थानकावर खासदार दुर्गादास उईके यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या शिवाय नागपूर, खापरी पांढुर्णा, बल्लारशाह, तीगाव, मुकुटबन आणि राजूर येथील कार्यक्रमांना स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, अतिरिक्त व्यवस्थापक पी. एस. खैरकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, संजय सिन्हा, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ए. के. सूर्यवंशी, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग, सहाय्यक व्यवस्थापक अमित कुमार उपस्थित होते.