पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब रेल्वे मार्गाचे बुधवारी उद्घाटन
By नरेश डोंगरे | Published: February 24, 2024 05:34 AM2024-02-24T05:34:21+5:302024-02-24T05:34:54+5:30
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा : रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी
नरेश डोंगरे
नागपूर : तीस दिवसांत दोनदा उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आता वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाची गाडी बुधवारी २८ फेब्रुवारीला वर्धा ते कळंब या रेल्वे मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेच्या नागपूर प्रशासनाने उद्घाटन कार्यक्रमाची जोरदार तयारी चालविली आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन मागास भागांच्या विकासाची गाडी समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प २८४.६५ किलोमीटर लांबीचा आहे. ११ फेब्रुवारी २००९ ला या प्रकल्पाचे तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते, तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत भूमीपूजन झाले होते. त्यावेळी त्यासाठी २७४.५५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. आता मात्र पंतप्रधान मोदी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करताना या प्रकल्पाचा खर्च सुमारे 5 ते 6हजार कोटींच्या घरात गेला आहे. दरम्यान, आतापावेतो १९१० कोटी, ७ लाख रुपये खर्च करून सरकारने वर्धा जिल्ह्यातील देवळी, भिडी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या रेल्वेस्थानकापर्यंतचे संपूर्ण काम पूर्ण केले आहे. सुरक्षेच्या मानकांची तपासणी करण्यासाठी वर्धा- देवळी ते कळंबपर्यंतची ट्रायलही घेतली. त्यानंतर वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वेगाडी चालविण्याचा प्रस्ताव वजा निर्णय रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम प्रारंभी १२ जानेवारी २०२४ ला ठरविण्यात आला. मात्र, नंतर तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ११ फेब्रुवारीला या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्याचे ठरले. मात्र, पंतप्रधानांचा यवतमाळ जिल्ह्याचा दाैरा पुढे ढकलण्यात आल्याने त्याहीवेळेला या मार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. आता मात्र २८ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधानांचा दाैरा, कार्यक्रम जवळपास निश्चिंत झाला आहे. रेल्वे मंत्रालयातूनही मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना तशी सूचना मिळाली आहे. त्यामुळे वर्धा-कळंब रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची तयारी करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामी लागले आहे.
उद्घाटनासाठी आम्ही सज्ज : अमन मित्तल
या संबंधाने अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी २८ फेब्रुवारीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची अधिकृत सूचना अद्याप आली नाही. तथापि, पंतप्रधानांच्या दाैऱ्याची माहिती आली असून आम्ही वर्धा-कळंब मार्गाच्या उद्घाटनासाठी सज्ज असल्याचे म्हटले.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, ही अत्यंत सुखद घडामोड : डॉ. विजय दर्डा
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. प्रकल्पाच्या मंजुरीपासून तो प्रकल्प पूर्णत्वास नेण्यापर्यंत डॉ. दर्डा यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचमुळे या प्रकल्पाला वेग मिळाला आणि आता या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे डॉ. दर्डा यांना या संबंधाने प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वत: या लोहमार्गाचे उद्घाटन करणार, ही खूपच सुखद घडामोड आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण तसेच व्यापारी अशा सर्वांसाठीच भरभराटीचे दिवस आणण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे आपल्याला आनंदच आहे. मात्र, या प्रकल्पाच्या नांदेडकडच्या भागाच्या कामाची गती अत्यंत संथ आहे.
वर्धा ते कळंब ३८.६१ किलोमिटरच्या मार्गासाठी १९१० कोटींचा खर्च झाला. अजून २४६ किलोमिटरचे काम पूर्ण व्हायचे असून, त्यासाठी आणखी मोठ्या निधीची गरज आहे. मा. पंतप्रधान मोदी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करीत असल्यामुळे आता उर्वरित कामालाही गती मिळेल आणि वर्षभराच्या आत हा प्रकल्प पूर्ण होऊन त्याचाही उद्घाटन सोहळा मा. पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते होईल, असा आपला विश्वास असल्याचे डॉ. दर्डा म्हणाले.