पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार
By admin | Published: September 3, 2015 02:52 AM2015-09-03T02:52:59+5:302015-09-03T02:52:59+5:30
सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार असल्याची घोषणा ...
हंसराज अहीर यांची घोषणा : पूर्ती बाजार येथील जेनेरिक औषधी विक्री केंद्राचे उद्घाटन
नागपूर : सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार असल्याची घोषणा केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी केली. आठ रस्ता चौक येथील पूर्ती बाजारमधील जेनेरिक औषध केंद्राचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी देशभरातील एक हजार तर वर्षभरात तीन हजार स्टोअर्समधून ही औषधी उपलब्ध करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये तसेच इतर शासकीय रुग्णालयात ५०४ प्रकारच्या जेनेरिक औषधी उपलब्ध केल्या जातील. अन्य औषधीच्या तुलनेत जेनेरिक औषधीच्या किमती ३० टक्के कमी आहे.
बेरोजगार,औषध विक्रीचा डिप्लोमा असणाऱ्यांना या औषधीचे विक्री केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक लाखाचे अनुदान देण्यात येईल. महाराष्ट्रातील १८०० प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय रुग्णालयात ही औषधी उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
देशात वर्षाला दोन लाख कोटींच्या औषधीचे उत्पादन होते. यातील ५० टक्के औषधीची २०० देशांना निर्यात केली जाते. यात अमेरिका व इंग्लड यासारख्या विकसित देशांचाही समावेश आहे. जागितक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार जेनेरिक औषधी गुणवत्तेच्या तुलनेत कुठेही कमी नाही. सर्वसामान्यांना वर्षाला अन्नधान्याइतकाच औषधावर खर्च करावा लागतो. त्यामुळे केंद्र सरकारने कमी किमतीत या औषधी उपलब्ध करणार असल्याने त्यांच्या खर्चात बचत होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पूर्ती सुपर बाजारचे अध्यक्ष रवी बोरटकर, कोषाध्यक्ष दीपक सप्तर्षी , सचिव राजीव हडप यांच्यासह सदस्य संदीप जाधव, अशोक धोटे, चानरायन आदी उपस्थित होते. सुमित्रा जाधव यांनी प्रस्ताविक केले. (प्रतिनिधी)