पंतप्रधानांचे विदेश दौरे फायद्याचेच
By admin | Published: September 27, 2015 02:46 AM2015-09-27T02:46:48+5:302015-09-27T02:46:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका कानावर पडते.
राहुल बजाज : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे. विविध करारांमधून विदेशी गुंतवणूक देशात येण्यासंदर्भातील मार्ग मोकळे होत आहेत, या शब्दात प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी यांच्या कार्यप्रणालीला ‘अ’ दर्जा दिला आहे. काही आठवड्यांपूर्वी बजाज यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती, हे विशेष.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला सोहळ्याला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकास लगेच होत नसतो. त्यामुळे ‘अच्छे दिन’ लगेच येणार नाहीत. गेल्या १६ महिन्यांत केंद्र सरकारकडून आश्वासक कामगिरी झाली आहे. उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे व हे देशासाठी सकारात्मक संकेत आहेत. १६ महिन्यांत सरकारच्या कामकाजाचे मूल्यांकन करणे योग्य होणार नाही. त्यामुळे वेळ दिला पाहिजे, असे मत बजाज यांनी व्यक्त केले.
केंद्र शासनातील बहुतांश मंत्री चांगले काम करीत आहेत. परंतु मंत्रिमंडळात काही फेरबदल आवश्यक वाटत असून, बिहार विधानसभा निवडणुकानंतर नव्या व अभ्यासू चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. १९९० नंतर मुंबईत काही उद्योगपतींनी एकत्र येत देशातील उद्योगांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. पंतप्रधानांचा ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम हे त्याचेच स्वरूप असल्याचे बजाज यांनी सांगितले.
‘जीएसटी’साठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावे
देशाच्या उद्योगक्षेत्राचा विकास लक्षात घेता ‘जीएसटी’ (गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. देशहित लक्षात घेता विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘संपुआ’च्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) काळात ‘जीएसटी’ला ‘रालोआ’ने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) विरोध केला होता. आता ‘संपुआ’कडून विरोध करण्यात येत आहे. देशाला विकास अपेक्षित आहे. त्यामुळे चांगल्या कामांसाठी राजकारण दूर सारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.(प्रतिनिधी)