पंतप्रधानांचा नागपुरात मुक्काम, राजभवनात कडेकोट सुरक्षाव्यवस्था; शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
By योगेश पांडे | Published: April 19, 2024 11:14 PM2024-04-19T23:14:37+5:302024-04-19T23:16:28+5:30
पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रमानुसार जबलपूर येथील प्रचार सभेनंतर ४.२० मिनिटांनी ते नागपूर विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्ध्याला गेले. सभा आटोपल्यानंतर पावणेसात वाजता हेलिकॉप्टरने नागपुरला परतले व सात वाजताच्या सुमारास राजभवनला पोहोचले.
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वर्धा येथून सुरुवात केली. तळेगाव येथे आयोजित सभेनंतर पंतप्रधान मुक्कामासाठी नागपुरात आले. शनिवारी सकाळी ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नांदेडकडे रवाना होतील.
पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रमानुसार जबलपूर येथील प्रचार सभेनंतर ४.२० मिनिटांनी ते नागपूर विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्ध्याला गेले. सभा आटोपल्यानंतर पावणेसात वाजता हेलिकॉप्टरने नागपुरला परतले व सात वाजताच्या सुमारास राजभवनला पोहोचले. रात्री त्यांचा तेथेच मुक्काम असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यांनी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास साधे जेवण घेतले.
शनिवारी सकाळी सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावरून नांदेडकडे प्रयाण होईल. दरम्यान, सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजभवनात बोलविले आहे. त्यात आजी-माजी आमदारांसोबतच जवळपास १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुर्व विदर्भात झालेले एकूण मतदान आणि नेमक्या स्थिती ते जाणून घेण्याची शक्यता आहे.