रेल्वेतून मद्याची तस्करी करणाराची 'प्रिंस'ने केली पोलखोल; अंदमान एक्सप्रेसमधून करीत होता तस्करी
By नरेश डोंगरे | Published: March 9, 2024 07:28 PM2024-03-09T19:28:15+5:302024-03-09T19:28:26+5:30
मध्य प्रदेशमधील प्रतिबंधित आणि स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या घेऊन 'तो' आंध्र प्रदेशकडे निघाला.
नागपूर: मध्य प्रदेशमधील प्रतिबंधित आणि स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या घेऊन 'तो' आंध्र प्रदेशकडे निघाला. प्रवासात नागपूर दरम्यान त्याने रेल्वेतील डब्यात बसलेल्या अनेक प्रवाशांना चकमा देण्यात यश मिळवले. मात्र, प्रिंस नामक श्वानाने या मद्य तस्काराचा डाव उलटवला आणि त्याला पोलिसांच्या कोठडीत पोहचवले. रवी अनिल (वय २७) असे आरपीएफने पकडलेल्या मद्य तस्कराचे नाव आहे. तो आंध्र प्रदेशमधील गुंटूरचा रहिवासी आहे.
मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी नकली दारू तयार करून ती ब्राण्डेड मद्याच्या बाटल्यात भरली जाते. ही दारू आरोग्यास अपायकारक असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यात तिच्यावर प्रतिबंध आहे. मात्र, स्वस्त किंमतीत ती सहज उपलब्ध असल्याने ठिकठिकाणचे मद्य तस्कर ही नकली दारू बोलवून विविध शहरातील ग्राहकांना विकतात. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्येही रेल्वे गाड्यांमधून या दारूची तस्करी केली जाते. रवी अनिल यानेही अशाच प्रकारे मध्य प्रदेशमधून दारूच्या ११८ बाटल्या खरेदी करून त्या तीन बॅगमध्ये भरल्या आणि तो ट्रेन नंबर १६०३२ च्या कोच नंबर ए-१ मध्ये बसला. बर्थ खाली त्याने दारू भरलेल्या बॅग दडवल्या.
ही गाडी सकाळी ९.३० नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर आली. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) विपीन सातपुते, निरज यांनी प्रिन्स नामक श्वानासह रेल्वे डब्याची तपासणी सुरू केली. बर्थ नंबर ३६ जवळून जाताना प्रिन्सला खाली असलेल्या दडवून असलेल्या बॅगमधून अंमली पदार्थाचा गंध आला. त्याने तसे संकेत त्याच्या हॅण्डलरला दिले. त्यामुळे आरपीएफच्या जवानांनी या बॅग बाहेर काढून त्या कुणाच्या आहेत, त्याबाबत विचारपूस केली असता रवी अनिल पुढे आला. त्याने बॅगमध्ये कपडे आणि ईतर साहित्य असल्याचे सांगून जवानांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रिन्सने बॅगमध्ये काही तरी वेगळे असल्याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे पंचासमोर त्या बॅग उघडण्यात आल्या असता त्यातून तब्बल ११८ दारूच्या बाटल्या निघाल्या.
प्रकरण उत्पादन शुल्क विभागाकडे
या दारूच्या बाटल्या जप्त करून पुढच्या कारवाईसाठी त्या बाटल्या आणि आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे (स्टेट एक्साईज) सोपविण्यात आले. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील अनेक शहरातून प्रतिबंधित दारू नागपूर मार्गे महाराष्ट्रातील विविध शहरात आणि आजुबाजुच्या प्रांतातही पोहचवली जाते. त्यासाठी तस्करांकडून विविध वाहनांचा उपयोग केला जातो. कधी कधी पोलीस ही दारू पकडतात. मात्र, राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे अधिकारी याकडे कानाडोळा करतात. कोणतीही मोठी कारवाई त्यांच्याकडून केली जात नाही.