सिनेटच्या प्राचार्य, व्यवस्थापन गटात शिक्षण मंचच आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 10:08 PM2022-11-22T22:08:05+5:302022-11-22T22:08:52+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत यावेळीही विद्यापीठ शिक्षण मंचने आघाडी घेतली.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत यावेळीही विद्यापीठ शिक्षण मंचने आघाडी घेतली. सिनेट प्राचार्य प्रवर्गाच्या १० जागांपैकी मंचने ६ जागांवर यश मिळविले. चार जागांवर महाआघाडीचे उमेदवार विजयी ठरले. व्यवस्थापन परिषदेवर ईश्वर चिठ्ठीच्या भरवशावर शिक्षण मंचने बाजी मारत ५ पैकी ३ जागा मिळविल्या. विद्यापीठ सिनेट शिक्षक गटाचा निकाल मात्र महाआघाडीसाठी समाधानाचा ठरला. येथे तिन्ही जागा काबीज करीत १०० टक्के यश मिळविले.
पदवीधर मतदारसंघ वगळता विद्यापीठ सिनेट व विद्वत परिषदेच्या शिक्षक, प्राचार्य, व्यवस्थापन परिषद प्रवर्गासाठी २० नाेव्हेंबरला मतदान झाले. मंगळवारी या निवडणुकांची मतमाेजणी झाली. आतापर्यंत एकमेकांच्या विराेधात लढणारे डाॅ. बबनराव तायवाडे यांची यंग टिचर्स असाेसिएशन आणि आमदार अभिजित वंजारी यांचे सेक्युलर पॅनलने यावेळी एकत्रित निवडणूक लढविली. या महाआघाडीमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असाेसिएशनचाही समावेश हाेता. अशातही भाजपा प्रणित विद्यापीठ शिक्षण मंचने निकालात बाजी मारली.
सिनेट प्राचार्य गटात शिक्षण मंचाचे ६ उमेदवार विजयी ठरले. यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात रामदास आत्राम ८१ मतांसह विजयी ठरले. विराेधी चेतन मसराम यांना ६० मते मिळाली. ओबीसी प्रवर्गात देवेंद्र भाेंगाडे व खुल्या प्रवर्गात महेंद्र ढाेरे, नीळकंठ लंजे, सचिन उंटवाले यांचा समावेश आहे. व्हीजेएनटीमधून मंचचे जयवंत वडते अविराेध निवडून आले. यंग टिचर्स-सेक्युलर महाआघाडीतून महिला वर्गात शरयू तायवाडे, एससी वर्गातून चंदू पाेपटकर व खुल्या वर्गातून जगदीश बाहेती व संजय धनवटे हे विजयी ठरले.
व्यवस्थापन परिषदेत ५ जागांपैकी मंचने ३ तर महाआघाडीने २ जागांवर विजय मिळविला. यातही आमदार वंजारी यांची पत्नी स्मिता वंजारी व स्वत: बबनराव तायवाडे हे विजयी ठरले. शिक्षण मंचकडून उमेश तुळसकर, अजय अग्रवाल व आर.जे. भाेयर विजयी ठरले. मंचचे भाेयर आणि महाआघाडीचे गुप्ता यांना सारखे मत मिळाले. शेवटी ईश्वरचिठ्ठीने मंचच्या भाेयर यांना विजयी घाेषित करण्यात आले.
विद्यापीठ सिनेट शिक्षक मतदार संघात महाआघाडीने मात्र १०० टक्के यश संपादित केले. यामध्ये खुल्या गटातून ओमप्रकाश चिमणकर, एसटी वर्गामधून वर्षा धुर्वे आणि महिला वर्गातून पायल ठवरे विजयी ठरल्या.