प्राचार्य वानखेडे यांची हत्या कौटुंबिक कलहातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:44 AM2017-11-05T00:44:39+5:302017-11-05T00:46:56+5:30
नरेंद्रनगर येथील प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांची हत्या कौटुंबिक कलहातून झाली. रोजच्या भांडणांमुळे त्रस्त होऊन मुलगी व पत्नीनेच त्यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नरेंद्रनगर येथील प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांची हत्या कौटुंबिक कलहातून झाली. रोजच्या भांडणांमुळे त्रस्त होऊन मुलगी व पत्नीनेच त्यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बजाजनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा शोध लावला असून, या प्रकरणात मृत प्राचार्यांची पत्नी अनिता वानखेडे, मुलगी सायली व तिचा मित्र शुभम ऊर्फ बंटी मोहुर्ले (२२) रा. हिंगणा नीलडोह, अंकित रामलाल काटेवार (१९) , शशिकांत ऊर्फ सोनू चंद्रकांत चौधरी (१९), सागर ऊर्फ पाजी बावरी (२०) याला अटक केली आहे, तर एक फरार आहे. पत्नी व मुलीने पाच लाख रुपयांत सुपारी किलरच्या
माध्यमातून हा खून केला असल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. नरेंद्रनगर येथील म्हाडा एलआयजी कॉलनी येथील रहिवासी असलेले मोरेश्वर वानखेडे हे तुकूम (चंद्रपूर) येथील खत्री कॉलेजमध्ये प्राचार्य होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजता चंद्रपूरला ड्युटीवर जाण्यासाठी आपल्या स्कुटीने रेल्वे स्टेशनकडे निघाले होते. आरोपी सागर ऊर्फ पाजी, अंकित, शशिकांत हे त्यांच्या घरापासूनच बाईकने पाठलाग करीत होते. त्यांचा चौथा साथीदार अंकुशने वर्धा रोडवरील नीरीच्या गेटजवळ दुचाकीला धडक देऊन मोरेश्वर यांना खाली पाडले. यानंतर त्यांच्या डोक्यावर, मानेवर तलवारीने हल्ला करून त्यांना ठार केले. मृत वानखेडे यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांना शुक्रवारी सकाळीच सापडले होते. तसेच प्राचार्य आणि त्यांचा पत्नीमधील वाद अजनी ठाण्यातील भरोसा सेलपर्यंत गेला होता. परंतु दोन्ही पती-पत्नी कौन्सिलिंगनंतर समजूतदारीने राहण्याचे आश्वासन देऊन गेले होते. अशा कारणांमुळे त्यांच्या खुनात जवळच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. परंतु वानखेडे यांच्या घरात दु:खद घटना घडल्याने पोलीस पत्नी व मुलीची विचारपूस करू शकत नव्हते. यानंतर मुलगी सायली हिने दरम्यानच्या काळात मोबाईलवर शुभम नावाच्या युवकाशी वारंवार संवाद साधल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी रात्री उशिरा शुभम मोहुर्ले याला हिंगण्यातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्राचार्याचा खून करण्यासाठी पत्नी व मुलीनेच पाच लाख रुपयाची सुपारी दिल्याचे कबूल केले. मृत प्राचार्याची मुलगी सायली ही शुभमच्या वर्गात शिकते. त्यामुळे तिने शुभमला तिचे वडील मोरेश्वर हे दररोज तिला शिवीगाळ करीत असतात, मारहाण करत असल्याचे सांगितले होते. तिच्या वडिलांमुळे त्रस्त होऊन तिने त्यांचे हातपाय तोडण्याची भाषाही केली होती.
यावर पाच लाख रुपयात प्राचार्यांना रस्त्यातून हटविण्याची तयारी दर्शविली होती. या खुनासाठी शुभमने त्याचा साथीदार अंकित, शशिकांत, अंकुश आणि सागर ऊर्फ पाजी याला तयार केले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच त्याने आई-मुलीकडून २० हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले होते. यानंतर शुभमने रेल्वे स्टेशनवर आरोपींना प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांना दाखविले. गेल्या १५ दिवसांपासून आरोपी त्यांचा पाठलाग करीत ये-जा करणाºया रस्त्यांवर नजर ठेवून होते. अखेर शुक्रवारी सकाळी ४.१५ वाजता आरोपींनी वानखेडे यांना नीरीसमोर ठार केले. यानंतर आरोपी आपापल्या घरी जाऊन झोपले. ही माहिती अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण) शामराव दिघावकर, डीसीपी स्मार्तना पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त केशव इंगळे, बजाजनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर पाटील, वैजयंती मांडवधरे, एपी आ. नागतिलक उपस्थित होते.
मानसिक आजाराने होते त्रस्त
आरोपी पत्नी अनिता उच्चशिक्षित असून एका प्रसिद्ध शाळेत शिक्षिका आहे. सूत्रानुसार प्राचार्य वानखेडे हे मानसिक आजाराने ग्रस्त होते. त्यांचा उपचार सुद्धा सुरू होता.
अपघात किंवा लुटमार झाल्याचे दाखवण्याची होती योजना
आरोपी सागर ऊर्फ पाजी बावरी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपी १२ वी आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. शुभम ऊर्फ बंटी सुद्धा आयटीआयचा विद्यार्थी आहे. कॉलेजमध्येच त्याची सायलीसोबत मैत्री झाली होती. दीड वर्षांपासून दोघांची मैत्री असल्याने घरी येणे-जाणे होते. वानखेडेचा खून करून तो अपघात किंवा लुटमार झाल्याचे दाखविण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार आरोपींनी अगोदर वानखेडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन खाली पाडले. गाडीचे नुकसान करून आणि खून केल्यावर वानखेडे यांची पर्स चोरून ही लुटमार असल्याचे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु तलवारीने थेट वार झाले असल्याने हा अपघात किंवा लुटमार नसून खूनच असल्याचे पोलिसांना स्पष्ट दिसून आले.