दीक्षाभूमीला वंदन करून स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:47 AM2017-09-26T00:47:17+5:302017-09-26T00:47:49+5:30

नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुण साधू यांना मिळावे हा अलौकिक योगायोगच होता.

Principals accepted by paying homage to Dikshit Bhoomi | दीक्षाभूमीला वंदन करून स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

दीक्षाभूमीला वंदन करून स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

Next
ठळक मुद्देबहुआयामी साहित्यिक हरपला : अरुण साधू यांच्या आठवणींना दिला नागपूरकरांनी उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुण साधू यांना मिळावे हा अलौकिक योगायोगच होता. साहित्याच्या अवकाशात लीलया वावरणाºया या वैदर्भीय मातब्बराने त्यातही आपले वेगळेपण जपले. पुरोगामी विचारांवर अपार श्रद्धा ठेवणाºया या साहित्यिक व पत्रकाराने धम्मस्थळ दीक्षाभूमीला वंदन करूनच संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अरुण साधू यांचे सोमवारी निधन झाले. नागपूरकरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लोकमतशी बोलताना साहित्य संमेलनाची आठवण आणि अरुण साधू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. साहित्य विश्वात साहित्यिक, समीक्षक, पत्रकार असे विविधांगी व्यक्तिमत्त्व म्हणून अरुण साधू यांनी ठसा उमटविला आहे. मराठी साहित्यात कमतरता असलेल्या राजकीय कादंबरीला त्यांनी नवे आयाम दिले. त्यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘सिंहासन’ या राजकीय कादंबरीवर निर्माण झालेला मराठी चित्रपट ‘मास्टरपीस’ ठरला. अशा या बहुआयामी साहित्यिकाची २००७ साली नागपूरला झालेल्या ८० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपदही मारुती चित्तमपल्ली या वैदर्भीय साहित्यिकाकडे होते. तब्बल ७३ वर्षानंतर संमेलन नागपूरला होत असल्याने त्याचे महत्त्वही मोठे होते. अरुण साधू यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने आदर्श असा आयाम संमेलनाला प्राप्त झाला. अतिशय कमी खर्चात आणि साधेपणाने, मात्र विचारांना चालना देणारे व वाङ्मयीन मूल्यांवर भर देणारे हे संमेलन सर्वार्थाने आदर्श ठरल्याची ग्वाही साहित्य विश्व देतो.
संमेलनाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी आदल्या दिवशी दीक्षाभूमीला भेट द्यावी असा निर्णय साधू यांनी घेतला. त्यांनी तशी माहितीही दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले आणि साहित्य महामंडळाला दिली. ठरल्याप्रमाणे ते दीक्षाभूमीवर गेले तेव्हा समितीच्या वतीनेही आदरातिथ्य करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
दुसºया दिवशी साहित्य संमेलनाच्या भाषणात आपली मूल्याधिष्ठित भूमिका त्यांनी प्रखरपणे मांडली. राजकीय विषय वेगळेपणाने हाताळणाºया अरुण साधू यांची शैली वेगळी होती. सामाजिक जाणिवेतून जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. ३० वर्षे पत्रकारितेतल्या झळाळत्या कारकिर्दीसोबतच त्यांनी मराठी साहित्यात राजकीय कादंबरीकार म्हणून कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवला. वैदर्भीय साहित्यावर त्यांची विशेष आस्था होती.
त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची अपरिमित हानी झाली आहे, असे मनोगत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.

अरुण साधू हे मराठी साहित्यातील एक वेगळे व्यक्तिमत्त्व होते. ते पत्रकार राहिल्यामुळे त्यांच्या सामाजिक जाणिवा अतिशय व्यापक होत्या. राजकारण, अर्थकारण, सामाजिक व्यवस्था व वर्तमान प्रश्न यांचे भान त्यांना होते. राजकीय व सामाजिक कादंबºयांमध्ये त्यांनी त्याचा साक्षेपी वापर केला. एरवी राजकीय अनुभवाबद्दल मराठी लेखक भाबडे असतात, मात्र साधू यांनी सिहांसन, मुंबई दिनांक व त्रिशंकू या कादंबºयांमधून महाराष्टÑातील राजकारणाचे सामाजिक व सांस्कृतिक अंगाने ताणेबाणे मांडले.या साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी ‘वेगळा विदर्भ हा चावून चोथा झालेला विषय आहे’ असे विधान केल्याने त्यावेळी विदर्भातील राजकीय वातावरण तापले होते. मात्र दिखाऊपणाने लेखक म्हणून मिरविण्यापेक्षा स्पष्ट भूमिका मांडणे त्यांनी अधिक पसंत केले. त्यामुळे मराठीत राजकीय कादंबरी समृद्ध झाली. त्यांच्या व्रतस्थ लेखनाविषयी वाचक व अभ्यासकांमध्ये त्यांच्याबद्दल कायम आदर राहील.
- डॉ. प्रमोद मुनघाटे, विभागप्रमुख,
राष्टÑसंत तुकडोजी महाराज अध्यासन.

Web Title: Principals accepted by paying homage to Dikshit Bhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.