नव्या पिढीत अहिंसेचे तत्त्व रुजवायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:15 AM2017-09-08T01:15:12+5:302017-09-08T01:15:27+5:30
वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैचारिक मतभेदात हिंसेचे स्थान निर्माण होत असून महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जग जिंकण्याची दिलेली शिकवणूक नव्या पिढीत रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी करावे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
नागपूर जिल्हा स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौरव समितीच्यावतीने माजी मंत्री स्व. शंकरराव गेडाम यांच्या जन्मदिनी त्यांचे बंधु स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ. पुंडलिकराव गेडाम यांचा भरतनगरातील भास्कर सभागृहात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी खासदार गेव्ह आवारी, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, सर्वोदय आश्रमाच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे, सेवाग्राम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्राचार्य महादेव नगराळे उपस्थित होते. माजी मंत्री हरिभाऊ नाईक म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही देशात सुराज्य निर्माण झाले नसून आजही अनेक प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या, भारत अहिंसेच्या मार्गावर स्वतंत्र झाला आहे. परंतु देशात अहिंसा वाढत असून स्वातंत्र्य सैनिकांनी नव्या पिढीला अहिंसेचा धर्म पटवून देण्याची गरज आहे. उमेश चौबे म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी जात-पात न पाहता देश स्वतंत्र केला. परंतु आज देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असून मजुरांचे हक्क हिरावल्या जात आहेत. ही स्थिती बदलविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढण्याची गरज आहे. गेव्ह आवारी म्हणाले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेनुसार भारताची जडणघडण होत आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.
धर्माचा प्रचार करून देशाला तोडणाºया शक्ती डोके वर काढत असून त्यांना रोखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मा. म. गडकरी यांनी जात, धर्म, पंथ सोडून देशातील जातीवाद नष्ट करण्याचे आवाहन केले. हरिभाऊ केदार यांनी समाजातील तळागाळातील माणूस हे सर्वांचे लक्ष्य असले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी आमदार यादवराव देवगडे यांनी केले. संचालन सुधा पावडे यांनी केले. आभार हरिभाऊ उमरकर यांनी मानले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.