कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:34 PM2018-07-13T22:34:20+5:302018-07-13T22:35:56+5:30
नव्या समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर होत असून चांगल्यासोबत विघातक परिणामही समाजाला सहन करावे लागत आहेत. याला आवरणारे कायदेही नाहीत आणि सामाजिक प्रणालीत तशी तत्त्वेही तयार झाली नाहीत. तंत्रज्ञानाद्वारे यावर निर्बंध घालणे भविष्यात शक्यही होईल. मात्र त्यातून व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. समाजात एकमेकांशी वागण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे कायदे नाहीत, पण सामाजिक तत्त्वांमधून आपण चांगले-वाईट शिकत असतो. तसेच नव्या माध्यमांच्या अभिव्यक्तीच्या नियंत्रणासाठी कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्या समाज माध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर होत असून चांगल्यासोबत विघातक परिणामही समाजाला सहन करावे लागत आहेत. याला आवरणारे कायदेही नाहीत आणि सामाजिक प्रणालीत तशी तत्त्वेही तयार झाली नाहीत. तंत्रज्ञानाद्वारे यावर निर्बंध घालणे भविष्यात शक्यही होईल. मात्र त्यातून व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. समाजात एकमेकांशी वागण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे कायदे नाहीत, पण सामाजिक तत्त्वांमधून आपण चांगले-वाईट शिकत असतो. तसेच नव्या माध्यमांच्या अभिव्यक्तीच्या नियंत्रणासाठी कायद्यापेक्षा तत्त्वांची बंधने महत्त्वाची ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, नागपूर प्रेस क्लब आणि प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लबच्या सभागृहात ‘फेक न्यूज: परिणाम आणि दक्षता’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, पीआयटीईचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, पत्रकार राहुल पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. जसजसा इंटरनेटचा वापर वाढला आहे तसतसे लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी माध्यमे देखील मिळू लागली. ही संवादाची समाज माध्यमे उपलब्ध झाल्याने लोकांच्या आशाआकांक्षा व अपेक्षा या माध्यमावर व्यक्त होऊ लागल्या व अभिव्यक्तीचा आनंद प्रत्येकजण पुरेपूर घेऊ लागला. हे चांगले असले तरी आज फेक न्यूजमधून अफवा पसरविण्यासाठी या माध्यमांचा वापर होऊ लागला आहे. त्याची कुठलीही शहानिशा न करता लोक एकमेकांना पाठवतात. हे संदेश अफवांचे रूप घेतात आणि दोन समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकून निर्माण होणाऱ्या दंगली आपण अनुभवल्या आणि माणसे जनावरांपेक्षा कशी हिंसक होतात ते पाहिले आहे. समाज हा संक्रमणावस्थेतून जात आहे, अशावेळी शाश्वत तत्त्वे सांभाळतांना युगानुकूल तत्त्वे निर्माण करावी लागतील. नव्या समाज माध्यमांचा वापर हा संसर्गजन्य आजारासारखा झाला आहे. हा संसर्ग चांगल्या कारणासाठी झाला तर या तत्त्वामधून सदृढ समाज निर्मितीसाठी उपयोग होईल. त्यासाठी समाज प्रबोधन करून युगानुकूल तत्त्वे निर्माण करण्यासाठी माध्यमांनी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.