वाठोड्यातील कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:07 AM2021-05-19T04:07:54+5:302021-05-19T04:07:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाठोड्यात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी सायंकाळी छापा घातला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोड्यात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी सायंकाळी छापा घातला. या छाप्यात तीन अल्पवयीन मुलींसह वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार जणी सापडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या अर्चना शेखर वैशंपायन नामक महिलेला पोलिसांनी अटक केली.
अर्चना गेल्या अनेक महिन्यांपासून हा गोरख धंदा चालवते. प्रारंभी ती अजनीमध्ये आणि नंतर बहादुरा परिसरात भाड्याच्या सदनिकेत कुंटणखाना चालवीत होती. तिच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला मुली आहेत. घरमालकाला संशय आल्याने त्यांनी तिला आपल्या घरातून हुसकावून लावले. दोन आठवड्यांपूर्वी तिने वाठोड्यात आठ हजार रुपये प्रतिमहिना किरायाने घर भाड्याने घेतले. तेथे ती वेश्या व्यवसाय चालवते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना मिळाली. त्यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांनी सोमवारी सायंकाळी सापळा रचला. अर्चना सोबत पोलिसांच्या पंटरने संपर्क साधला. दोन हजार रुपये दिल्यास अल्पवयीन मुली शरीरसंबंधासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी अर्चनाने दाखवली. त्यानुसार ग्राहकाने तिला सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास रक्कम दिली. त्यानंतर अर्चनाने तीन अल्पवयीन तसेच एक तरुणी अशा चार वारांगना ग्राहकांसमोर उभ्या केल्या. त्यातील एकीला ग्राहकाने रूममध्ये नेले. ठरल्याप्रमाणे काही वेळातच तेथे पोलिसांनी छापा घातला. आरोपी अर्चना वैशंपायन हिला अटक करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या चौघींचे जबाब नोंदविण्यात आले.
---
७५ टक्के लाटत होती अर्चना
प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रति ग्राहक दोन हजार रुपये घेणारी अर्चना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या हातात पाचशे रुपये ठेवत होती. अर्थात, ७५ टक्के रक्कम ती स्वतः लाटत होती. दरम्यान, अर्चनाविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे, हवालदार अनिल अंबाडे, नायक संदीप चांगोले, भूषण झाडे, अजय, चेतन, प्रतिमा आदींनी ही कारवाई केली.
---
२० पर्यंत कोठडी
अर्चनाला वाठोड्याच्या ठाणेदार आशालता खापरे यांनी आज न्यायालयात हजर करून तिची २० मेपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. पुढील तपास सुरू आहे. तिच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, मुली तसेच ग्राहकांची भली मोठी यादी असल्याचे समजते.