निडोज बारवर छापा
By admin | Published: July 1, 2017 02:04 AM2017-07-01T02:04:00+5:302017-07-01T02:04:00+5:30
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंजे चौकातील निडोज बार अॅन्ड
जिल्हाधिकाऱ्यांचा दणका डान्सबार सापडला ? चार तरुणी ताब्यात, मद्यसाठा जप्त एक्साईज आणि पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंजे चौकातील निडोज बार अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा घातला. यावेळी तेथे काही तरुणी आणि मद्याच्या बाटल्यांसह आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मुंजे चौकातील महाराष्ट्र बँकेच्या बाजूला असलेले निडोज बार आणि रेस्टॉरंट ५०० मीटरच्या मर्यादेच्या अटीमुळे बंद पडले आहे. हा बार राजू जयस्वाल यांच्या मालकीचा आहे. या बंद पडलेल्या बारमध्ये डान्स बार तसेच अनैतिक प्रकार सुरू आहे, अशी गोपनीय माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना शुक्रवारी रात्री मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यावरून काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता निडोज बारमध्ये छापा घातला. बेसमेंट आणि दोन माळे अशी रचना असलेल्या निडोजच्या इमारतीत यापूर्वी आॅर्केस्ट्रा चालायचा. वरच्या माळ्यावर काही शयनकक्षही आहेत. तेथे आॅर्केस्ट्रात काम करणाऱ्या तरुणी मुक्कामी राहायच्या. छापा घालणाऱ्या अधिकाऱ्यांना तेथे चार तरुणी आणि अन्य काही जण दिसल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांना मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी एसीपी राजेश बोरावके यांना पोलीस ताफ्यासह पाठविले. मध्यरात्री १२ पर्यंत तेथे कारवाई सुरू होती. यावेळी पोलिसांनी बेसमेंटमध्ये तरुणींची चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन धंतोली ठाण्यात नेले. बार बंद असूनही तेथे मोठ्या प्रमाणात महागड्या दारूच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याची माहिती आहे. ते जप्त करण्यात येणार असून, ही कारवाई मुळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. पोलीस त्यांच्या मदतीसाठी आल्याचे एसीपी बोरावके यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, ही चर्चा सर्वत्र पसरल्याने मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी जमली. रात्री १२.१५ वाजता पोलीस उपायुक्त राकेश ओला तेथे पोहचले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत काय कारवाई केली, त्याची माहिती जाणून घेतली.