‘अश्लील डान्स पार्टी’वर छापा, १३ डान्सर्ससह ३७ जणांना अटक; ४८.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 11:02 AM2023-10-03T11:02:33+5:302023-10-03T11:03:07+5:30
‘सिल्व्हरी लेक रिसॉर्ट’मध्ये सुरू होती छमछम अन् ओली पार्टी : पाचगाव शिवारातील घटना
नागपूर : नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव (ता. उमरेड) शिवारातील ‘सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्ट’मध्ये सुरू असलेल्या अश्लील डान्स पार्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री धाड टाकली. यात १३ तरुणींसह एकूण ३७ जणांना अटक करण्यात आली. या पार्टीमध्ये अनेक धनाढ्य लोकदेखील सहभागी झाले होते व विनापरवानगी दारूची विक्री सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच कार, दारूच्या साठ्यासह ४८.४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
‘सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्ट’मध्ये अश्लील डान्स पार्टी सुरू असल्याची माहिती कळताच ‘एलसीबी’च्या अधिकाऱ्यांनी अगोदर पाहणी केली. तेथे डान्स सुरू असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांचे पथक आत गेले. तेथे काही तरुण अश्लील नाच करत असल्याचे दिसून आले. तसेच मुलींवर पैसे उधळले जात होते. धाड टाकल्यावरदेखील गाणे सुरूच होते व अनेकांना याची कल्पना नव्हती. धाड पडल्याचे कळताच पळापळ झाली. मात्र, सर्वांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी २४ पुरुष व १३ तरुणींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून वाहने, राेख रक्कम, विदेशी दारू व इतर साहित्य जप्त केले.
याप्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर, बट्टूलाल पांडे, चंद्रशेखर गाडेकर, ज्ञानेश्वर राऊत, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, मयूर ढेकले, दिनेश अधापुरे, विनोद काळे, भुरे, अमृत किनगे, रोहन डाखोरे, वनिता शेंडे, कविता बचले, राकेश तालेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अश्लील गाणी अन् ताेकडे कपडे
या पार्टी डान्स करणाऱ्या तरुणींनी ताेकडे कपडे परिधान केले हाेते. साऊंड सिस्टीमवर वाजवली जाणारी गाणी अश्लील हाेती. डान्स करणाऱ्यांचे हातवारे व हावभाव अश्लील हाेते. त्या तरुणींवर नाेटा उधळल्या जात हाेत्या. पार्टीत सहभागी झालेल्यांना रिसॉर्ट मालकाकडून अवैधरीत्या विदेशी दारू पुरविली जात हाेती.
अटक झालेले आरोपी
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये रिसॉर्ट चालक राजबापू मुथईया दुर्गे (नागपूर), व्यवस्थापक विपीन यशवंत अलाेणे (जगनाडे चौक, नागपूर), डान्स करणाऱ्या तरुणी पुरविणारा भूपेंद्र उर्फ मॉन्टी सुरेश अणे (रामटेक), शुभम ओमप्रकाश पाैनीकर (जुनी मंगळवारी, नागपूर), अभय व्यंकटेश सकांडे (वर्धा), आशिष नत्थूजी सकांडे (वर्धा), हर्षल भाऊराव माळवे (वर्धा), गोविंद जेठालाल जोतवानी (वर्धा) व संजय सत्यनारायण राठी (वर्धा), अतुल ज्ञानेश्वर चापले, (आंजी-मोठी, वर्धा), विशाल माणिकराव वाणी (जुनोना, वर्धा), विजय सदाशिव मेश्राम (तिगाव, वर्धा), प्रवीण महादेवराव पाटील (मसाळा, वर्धा), अशोक तुकाराम चापडे (सेलू, वर्धा), कौसर अली लियाकत अली सईद (केळझर, वर्धा), प्रशांत ज्ञानेश्वर घोंगडे (जुनापाणी, वर्धा), प्रवीण रामभाऊ बीडकर (रोठा, वर्धा), सतीश उद्धव वाटकर (हिंगणी, वर्धा), महेश महादेव मेश्राम (झडशी, वर्धा), आकाश किसनाजी पिंपळे (झडशी, वर्धा), राकेश विठ्ठलराव भांढेकर (खापरी, वर्धा), अविनाश शंकरराव पंधराम (बोरखेडी-कला, वर्धा), गजानन रामदास घोरे (पिंपळगाव, बाळापूर, अकोला), राजेश रमेश शर्मा (दयाळनगर, अमरावती) यांच्यासह १३ तरुणींचा समावेश आहे.