कमी खर्चात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामांना प्राधान्य : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:14 PM2018-11-22T22:14:45+5:302018-11-22T22:17:53+5:30
भारत विकसनशील देश असल्याने आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट आॅफ कंस्ट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत विकसनशील देश असल्याने आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट आॅफ कंस्ट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली इंडियन रोड काँग्रेसचे ७९ व्या अधिवेशनाला गुरुवारपासून मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या तांत्रिक (टेक्निकल) प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयआरसीचे सेक्रटरी जनरल निर्मल कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी, मुख्य अभियंता आणि आयआरसी आयोजन समितीचे अध्यक्ष उल्हास देबडवार, स्थानिक आयोजन समितीचे सचिव रमेश होतवानी आणि अधीक्षक अभियंता सरदेशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, आयआरसीच्या अधिवेशनात तांत्रिक शोधपत्रे आणि नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यात येणार आहे. यातून ज्या नियमावली आणि मानके ठरतील, त्याचा फायदा देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना होणार आहे. सोबतच सरकारचा पायाभूत सुविधांवर भर असून टाकाऊ वस्तू, कचरा आणि राखेपासून रस्ते निर्मितीमधील साहित्यांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये सुमारे २०० स्टॉल्स लावण्यात आले असून यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान सादर करणारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सना भेट दिली आणि माहिती जाणून घेतली.