सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : पालकमंत्री नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:41 PM2020-01-27T23:41:17+5:302020-01-27T23:44:01+5:30
विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धारने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविकास आघाडीच्या शासनाने शेतकरी, कामगार आणि तळागाळातील जनतेला सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यास प्राधान्य दिले आहे. विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धारने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम येथील कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्वीकारून पथसंचलनाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, खा.डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या सभापती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. या समृद्ध लोकशाही परंपरेचे रक्षण करणे आणि तिला जोपासणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी केलेले कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
मिलिंद तोतरे, बट्टूलाल पांडे राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे आणि बट्टूलाल पांडे यांना उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच कुणाल धुरट आणि सुधीर इंगोले यांचाही सन्मान करण्यात आला. याशिवाय डॉ. सीमा रेवाळे, डॉ. सोनाली वानखडे, डॉ. सुचित्रा मनूरकर, डॉ. सुरेश माने, डॉ. हर्षदा फटिंग यांना राष्ट्रीय मूल्यांकन पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. जय कविश्वर, मोहिनी बुटे, मालविका बन्सोड, हर्षदा दमकोंडावार, प्रतिमा बोंडे, यश कांबळे, हिमानी फडके, अभिषेक ठावरे या क्रीडापटूंना तर परीक्षित गोहिया आणि रमेश बंग या क्रीडा मार्गदर्शकांना विविध क्रीडास्तरावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.