उत्पन्नासह पाणी प्रश्नाला प्राधान्य : अभिजित बांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:10 AM2018-11-18T01:10:53+5:302018-11-18T01:11:54+5:30
महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्तअभिजित बांगर यांनी दिली.
महापालिकेत रुजू झाल्यानंतर बांगर पहिल्यांदा पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्यामुळे तलावांमध्ये पाणीसाठा कमी आहे. परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आगामी उन्हाळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येईल. जीएसटी लागू झाला आहे. जीएसटीच्या शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर महापालिकेचे उत्पन्न अवलंबून आहे. हे अनुदान पुरेसे नाही. तथापी महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नवाढीवर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मालमत्ता कराच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्यात येईल. सोबतच महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अत्यावश्यक ठरले आहे.
शहराच्या विकासासंदर्भात बोलताना आयुक्त बांगर म्हणाले नागरिकांकडून प्राप्त समस्या आणि त्यांच्या अडचणीनुसार शहरात काम करणे आवश्यक आहे. एकूणच शहरातील नागरिक, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वयातून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी प्रकल्प, स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजना यशस्वीपणे राबविण्यावर आपला भर राहणार आहे. पालघर आणि अमरावती शहराचा अनुभव आपल्या पाठीशी असून शहराच्या विकासाकरिता लोकांकडून अभिप्रायांची अपेक्षा आहे. सामान्य जनता, प्रशासनासोबत काम करतानाच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार काम करण्याची भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...तर वाद होणार नाही
नागरिकांची सेवा करणे हाच प्रामाणिक उद्देश असेल तर वाद होणार नाही, असेही मनपा आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. महापालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचे तास वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले. सर्वच ठिकाणी मनुष्यबळाची समस्या आहे. त्यामुळे कामाचे तास वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.