जेल बे्रकचा छडा लागला
By admin | Published: May 15, 2015 02:32 AM2015-05-15T02:32:22+5:302015-05-15T02:32:22+5:30
मध्यवर्ती कारागृहातून दीड महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या पाच खतरनाक कैद्यांपैकी दोघांना तसेच त्यांच्यासोबतच्या अन्य एका गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले.
पळून गेलेल्यांपैकी दोघे अडकले : एक साथीदारही गजाआड
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातून दीड महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या पाच खतरनाक कैद्यांपैकी दोघांना तसेच त्यांच्यासोबतच्या अन्य एका गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले. शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान (वय २४, रा. मानकापूर) आणि प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (वय २४, रा. नेपाळ) अशी ‘जेल ब्रेक’मधील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एक माऊझर, दोन कट्टे आणि दहा काडतुसेही जप्त केली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली.
शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) हे पाच कैदी ३१ मार्चच्या पहाटे मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले होते. हे सर्व कारागृहाच्या बराक क्रमांक ६ मध्ये १५४ कैद्यांसोबत बंदिस्त होते.
पळून जाण्याचा कट कसा अंमलात आला, त्याची माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले, कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी कारागृहाच्या आत चप्पलमध्ये आरी लवपून नेली. तब्बल सहा ते सात दिवस त्यांनी या आरीच्या माध्यमाने खिडकीची लोखंडी गज (सळाख) कापली. ती वाकविल्यानंतर त्यातून क्रमश: पाचही जण उड्या मारून बराकीच्या बाहेर आले. त्यांनी छोटी भिंत ओलांडली. त्यानंतर २३ फूट उंच असलेल्या भिंतीला दोघे टेकले. या दोघांवर पुन्हा दोघे चढले आणि त्यांच्यावर चढलेला एक जण भिंतीवर पोहोचला. कारागृहातील पाच ते सहा चादरींची त्यांनी दोरी बनविली आणि एकेक करीत सर्व त्या भिंतीवर चढून आरोपी पळून गेले. बाहेर असलेल्या त्यांच्या साथीदारांनी मोटरसायकलवर दोन चकरा मारून त्यांना बकरामंडीत पोहोचविले. तेथून ते छिंदवाड्याच्या बसमध्ये बसून नागपुरातून पळून गेले.
पत्रकारांचा अपमान : आयुक्तालयात पत्रपरिषद सुरू होण्यापूर्वी पोलीस शिपाई जयंता शेलोट याने एका ज्येष्ठ वार्ताहरासोबत तसेच तत्पूर्वी, गुन्हेशाखेत गेलेल्या काही पत्रकारांना त्याने अर्वाच्य भाषेचा वापरअपमानित केले. आयुक्तांकडे पत्रकारांनी या गैरप्रकाराची तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
मासे गळाला लागले
या घटनेनंतर आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत होती. गुन्हे शाखेची पथके मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह विविध प्रांतात जाऊन आले. मात्र त्यांचा शोध लागेना. दरम्यान, पळून गेलेल्या शिबू आणि नेपाली आर्थिक अडचणीत असल्याचे कळाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने त्यांना ‘बडा गेम बजाना है’, असे आमिष दाखवून नागपूरकडे बोलविले. त्यानुसार शिबू, नेपाली आणि त्यांचा उत्तर प्रदेशातील एक साथीदार अरमान मुन्ना मलिक (वय २३, रा. जालौन) गुरुवारी सकाळी कोराडी जवळच्या बोखारा येथे पोहोचले. त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अन्य फरार गुन्हेगारांची आणि बरीच महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यताही पोलीस आयुक्त यादव यांनी व्यक्त केली. यावेळी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर उपस्थित होते.