जेल शिपायाची आत्महत्या मानसिक छळातून ?
By admin | Published: October 21, 2015 03:15 AM2015-10-21T03:15:50+5:302015-10-21T03:15:50+5:30
जेल शिपाई राजाभाऊ शंकरराव वानखेडे यांनी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असून
नागपूर : जेल शिपाई राजाभाऊ शंकरराव वानखेडे यांनी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असून आत्महत्येचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राजाभाऊ वानखेडे यांनी सोमवारच्या रात्री आपल्या महाल झेंडा चौक येथील राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांनी पलायन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कारागृहातून मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे संशय घेऊन या कारागृहातील १५ शिपायांना एप्रिलमध्ये अन्य कारागृहांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. राजाभाऊ यांना चंद्रपूर कारागृहात पाठविण्यात आले होते.
प्रतिनियुक्तीचा काळ एक-दोन महिन्याचा असतो. तरीही अन्यत्र पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा काळ लोटूनही त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत बोलावण्यात आले नाही. या शिवाय त्यांच्या रजाही बंद करण्यात आल्या आहेत. सुमारे दीडशेवर कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज अद्यापही वरिष्ठांच्या टेबलवर धूळखात पडून आहेत.
राजाभाऊ वानखेडे यांना रजा तर मिळत नव्हतीच, शिवाय चार महिन्यापासून त्यांचा पगारही रोखण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या जीपीएफमधून एक लाख रुपये काढले होते. रजा आणि वेतन अडविण्यात आल्याने ते मानसिक त्रस्त झाले होते. त्यामुळे मद्याच्या आहारी जाऊन त्यांनी आत्महत्या केली, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)