वहिनीला आत्महत्येस प्रवृत्त केले शिक्षिकेला कारावासाची शिक्षा
By admin | Published: December 20, 2015 03:21 AM2015-12-20T03:21:28+5:302015-12-20T03:21:28+5:30
चुलत भावाच्या पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीश एस.बी. गावंडे यांच्या न्यायालयाने एका आरोपी शिक्षिकेला तीन वर्षे सश्रम कारावास ...
नागपूर : चुलत भावाच्या पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीश एस.बी. गावंडे यांच्या न्यायालयाने एका आरोपी शिक्षिकेला तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातून अन्य एका महिला आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली.
लीला बाबूराव मेश्राम (५२) रा. बजेरिया , मच्छीमार्केट, असे शिक्षा झालेल्या आरोपी महिलेचे नाव असून ती शिक्षिका आहे. स्नेहा हश्मी चौधरी (२३), असे निर्दोष सुटका झालेल्या महिलेचे नाव असून ती लीला मेश्रामची मुलगी आहे. तृप्ती निशांत मेश्राम (३२), असे मृत महिलेचे नाव होते. मृत तृप्तीची लीला ही चुलत नणंद आहे. तृप्तीच्या धमकीचा इशारा ऐकून लीलाबाई पुन्हा संतप्त झाली होती. ‘तू एका बापाची औलाद असशील तर मरून दाखवशील’, असे म्हणत लीलाने तिला चिथावणीच दिली होती. त्यामुळे तृप्तीने चिठ्ठी लिहून उंदिर मारण्याचे औषध सेवन करून आत्महत्या केली होती. मृत तृप्तीचा भाऊ विशाल घोडेस्वार याच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी भादंविच्या ३०६, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून मायलेकीस अटक केली होती. उपनिरीक्षक टी.जी. गाडेकर यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात १२ साक्षीदार तपासण्यात आले. लीला मेश्रामविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन तिला भादंविच्या ३०६ कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड, भादंविच्या ५०६ कलमांतर्गत सहा महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड सुनावण्यात आला. स्नेहा चौधरी हिची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील संगीता एन. पवार यांनी काम पाहिले. अॅड. अनुप बदर यांनी सरकारला साहाय्य केले. (प्रतिनिधी)
रांगोळीने केला घात
खटल्याची पार्श्वभूमी अशी, २ आॅक्टोबर २०१४ दसऱ्याचा दिवस होता. त्यामुळे सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास स्नेहा चौधरी ही आपल्या घराच्या अंगणात रांगोळी घालत होती. त्याच वेळी शेजारी राहणारी तृप्ती मेश्राम ही आपल्या घरासमोर सडा शिंपत होती. अचानक पाण्याचे शिंतोडे स्नेहाच्या रांगोळीवर उडाले होते. परिणामी स्नेहा आणि लीलाने तृप्तीला अश्लील शिवीगाळ करीत भांडण केले होते. तृप्तीचा पती निशांत मेश्राम हा भांडण सोडविल्यानंतर आपल्या कार्यालयात निघून गेला होता. त्यानंतर या दोघी मायलेकीने पुन्हा तृप्तीसोबत भांडण केले होते. भांडण असह्य होऊन तृप्तीने लीलाला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.