राज्यात जेल टुरिझम २६ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:02+5:302021-01-25T04:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात जेल टुरिजम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २६ जानेवारीला येरवडा (पुणे) कारागृहातून त्याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कारागृह पर्यटनाचा (जेल टुरिझम) हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचीही माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील अनेक कारागृहात संबंधित घडामोडींचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जपून ठेवण्यात आले आहेत.
येरवडा, ठाणे, नाशिक, नागपूर कारागृह स्वातंत्र्यलढ्यादरम्यानच्या अनेक घटना, प्रसंगाचे साक्षीदार आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोर मंडळी या कारागृहात राहिली आहेत. ते ज्या ठिकाणी राहिले, त्या कोठड्यांचेही जतन करण्यात आले आहे. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करारही याच कारागृहातील आंब्याच्या झाडाखाली झाला आहे. त्या झाडाचेही जतन करण्यात आले आहे. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, जनरल वैद्य यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा तसेच चाफेकर बंधूंना येरवड्यातच फासावर टांगण्यात आले होते. अशा अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या येरवडा कारागृहाची सर्वांना, खास करून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेल टुरिझमचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येरवडानंतर राज्यातील अन्य कारागृहांतही कारागृह पर्यटन सुरू केले जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
माफक क्षुल्क घेणार
पर्यटक म्हणून ज्यांना कारागृह बघायचे आहे, त्या व्यक्ती, संस्थांना आधी अर्ज करावा लागेल. कारागृहात जाताना खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाइल, कॅमेरा, पाण्याची बाटली अथवा कुठलीच वस्तू आतमध्ये नेता येणार नाही. प्रशासनाकडून फोटो आणि व्हिडीओग्राफीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ते नंतर संबंधितांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंबंधीचे प्रवेश शुल्क शालेय विद्यार्थ्यांसाठी ५, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १०, तर अन्य पर्यटकांना केवळ ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
अर्णबविरुद्ध कारवाईसाठी चाचपणी
पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांनी अर्णब गोस्वामीचा मुद्दा उपस्थित केला. बालाकोटमधील हल्ल्याची माहिती अर्णबला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती, असे बारप्रमुख दासगुप्तासोबतच्या चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल का, त्यासंबंधाने कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले. नाईक प्रकरणात अर्णबविरुद्ध कारवाई झाली त्यावेळी भाजप नेत्यांनी त्याचा उघड बचाव केला होता. आता प्रकरण थेट देशाच्या सुरक्षेशीच संबंधित आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी देशमुख यांनी केली.