नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 10:32 PM2022-06-10T22:32:27+5:302022-06-10T22:33:02+5:30
Nagpur News १५ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला गोंदिया जिल्ह्यातील एका कैद्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला.
नागपूर - १५ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला गोंदिया जिल्ह्यातील एका कैद्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे २.४५ च्या सुमारास ही घटना उघड झाल्यानंतर कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली.
कंटजी (काळा, जि. गोंदिया) येथील मुळ निवासी असलेला मंगेश अनिल हिरकणे (३६) असे मृत कैद्याचे नाव आहे. हत्येच्या आरोपात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर २००७ पासून तो येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. कारागृहातील प्रत्येक बराकित स्वच्छतागृह असून बाजूला पाण्याचे टाके आहे. मध्यरात्री हिरकणे पाण्याच्या टाक्यात जाऊन बसला. बराच वेळ होऊनही तो बाहेर निघाला नाही. त्यामुळे कर्तव्यावरील जवानाने बराकीत तपासणी केली असता हिरकणे पाण्याच्या टाकीत बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मेडिकलच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती कळाल्यानंतर धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हिरकणे याने आत्महत्या केली की त्याचा अपघाती मृत्यू झाला, त्याची चाैकशी पोलीस करीत आहेत.
मिरगीचा रुग्ण होता
या संबंधाने चाैकशी केली असता हिरकणे हा मिरगीचा रुग्ण होता. तो नेहमी आपल्याच धुंदीत राहायचा. अनेकदा स्वतःशीच गप्पा केल्यासारखा वागत होता, अशी माहिती कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दिली.
---