जातीय अत्याचारात आरोपीला कारावास

By admin | Published: September 10, 2016 02:05 AM2016-09-10T02:05:47+5:302016-09-10T02:05:47+5:30

एका आदिवासी महिलेच्या दोन भूखंडांवर अतिक्रमण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एका आरोपीला अनुसूचित जाती जमाती

Prisoner imprisoned for racial abuse | जातीय अत्याचारात आरोपीला कारावास

जातीय अत्याचारात आरोपीला कारावास

Next

विशेष न्यायालयाचा निकाल : आदिवासी महिलेची होती तक्रार
नागपूर : एका आदिवासी महिलेच्या दोन भूखंडांवर अतिक्रमण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एका आरोपीला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ५,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

शकीब अहमद मुस्ताक अहमद (३४), असे आरोपीचे नाव असून तो मंगळवारी बाजार येथील रहिवासी आहे. राजेश्री दामोदर मसराम (६२), असे फिर्यादी महिलेचे नाव असून त्या राजेंद्रनगर येथील रहिवासी आहेत.
प्रकरण असे की, राजेश्री मसराम यांनी १९७९ मध्ये शशीकांत बोदड को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे ३ आणि ४ क्रमांकांचे दोन भूखंड खरेदी केले होते. या दोन्ही भूखंडांची रजिस्ट्रीही झाली होती. त्यांनी आपल्या जागेवर एक खोली आणि कंपाऊंड भिंत उभारली होती. ३ डिसेंबर २०१३ रोजी शकीब अहमद याने खोली आणि कंपाऊंड भिंत तोडून भूखंडांवर अतिक्रमण केले होते. मसराम दाम्पत्याने आरोपीला हटकले असता त्याने या दाम्पत्याला धमकी देऊन भूखंडांचा ताबा सोडण्यास फर्मावले होते. जातीवाचक शिवीगाळ करीत बर्बाद करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती.
या घटनेनंतर ८ डिसेंबर रोजी मसराम दाम्पत्य पुन्हा आपल्या भूखंडांवर गेले असता पुन्हा त्याने जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती.
अशी आहे शिक्षा
नागपूर : राजेश्री मसराम यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी भादंविच्या ४४७, ४२७, ५०६ ब, ३ (१)(५) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१)(१०) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.
जरीपटका विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने १० आणि बचाव पक्षाच्या वतीने एक साक्षीदार तपासण्यात आला. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(५) अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याच कायद्याच्या कलम ३ (१)(१०) अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भादंविच्या ४२७ कलम अंतर्गत १ वर्ष कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भादंविच्या४४७ कलमांतर्गत ३ महिने साधा कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीला या सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अजय निकोसे तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. बशीर अहमद यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Prisoner imprisoned for racial abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.