पोलिसांच्या ताब्यातून जन्मठेपेचा कैदी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:05 PM2018-11-28T22:05:34+5:302018-11-28T22:07:23+5:30
खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील कैदी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी जळगाव येथील बोदवडजवळ घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश ऊर्फ छोट्या जयमुख काळे रा. तळोजा, नाशिक असे फरार कैद्याचे नाव आहे. सतीश सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तळोजा येथील तुरुंगात त्याचे अनेक प्रतिस्पर्धी बंद असल्याने सतीशला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातील कैदी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी जळगाव येथील बोदवडजवळ घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सतीश ऊर्फ छोट्या जयमुख काळे रा. तळोजा, नाशिक असे फरार कैद्याचे नाव आहे. सतीश सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. तळोजा येथील तुरुंगात त्याचे अनेक प्रतिस्पर्धी बंद असल्याने सतीशला नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते.
नाशिकच्या एका न्यायालयात सतीशची पेशी होती. यासाठी त्याला नाशिकला नेले जात होते. २६ नोव्हेंबर रोजी शहर पोलिसचे चार सशस्त्र जवान सतीशसोबत नाशिकसाठी नागपूर सेवाग्रामने रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी पहाटे जळगाव येथील बोदवड स्टेशनजवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सतीश फरार झाला. तो फरार झल्याचे पोलिसांना खूप उशिरा लक्षात आले. त्यानंतर सतीशचा शोध घेण्यात आला, परंतु यश आले नाही. पोलिसांनी बोदवडच्या रेल्वे पोलिसांना सूचना दिली. तिथे सतीशच्या विरुद्ध पोलीस ताब्यातून फरार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वेतून गुन्हेगार फरार होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश वेळोवेळी देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच सराईत गुन्हेगारांना घेऊन जाताना सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले जाते. सतीश कुख्यात गुन्हेगार आहे. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने त्याच्यावर पाळत ठेवायला हवी होती. तेव्हा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच सतीश फरार झाल्याचे दिसून येते. तो फरार झाल्याने नाशिक पोलिसही सतर्क झाले आहेत.
कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता
शहर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वीही गुन्हेगार फरार झाले आहेत. सतीशवर पाळत ठेवणारे कर्मचारी मुख्यालयातील असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंबंधात डीसीपी मुख्यालय गजानन राजमाने यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी केली जात आहे.