कैदी करतात जीवघेणी मोबाईल चार्जिंग
By admin | Published: April 3, 2015 01:46 AM2015-04-03T01:46:12+5:302015-04-03T01:46:12+5:30
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैद्यांपर्यंत पोहोचलेले मोबाईल कसे चार्ज केले जातात,
राहुल अवसरे ल्ल नागपूर
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैद्यांपर्यंत पोहोचलेले मोबाईल कसे चार्ज केले जातात, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. कैदी स्वत:चा जीव धोक्यात घालूनच मोबाईल चार्ज करीत होते, अशी धक्कादायक माहिती आहे.
पाच खतरनाक कैद्यांच्या पलायनानंतर कदाचित कारागृहातील मोबाईलचा वापर बंद झाला असेल ? पण एरव्ही मोबाईल हे येथील कैद्यांसाठी ‘लाईफ लाईन’ ठरले होते. सूत्रांच्या माहितीनुसार इतर कैद्यांची निजानीज झाल्यानंतर कोणी पत्नीसोबत, कोणी प्रेयसीसोबत, कोणी मित्र आणि नातेवाईकांसोबत तासन्तास बोलायचे, पहाटे २-३ वाजेपर्यंत बोलणे सुरू असायचे. खंडणीसाठी आणि वकिलांचा सल्ला घेण्यासाठीही मोबाईलचा मोठा वापर होत होता. प्रत्येक बराकींमध्ये कैद्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही आहेत. टीव्हीचे होल्डर पिन लावण्याचा बोर्ड बराकीतच राहत होता. कैदी विजेच्या बोर्डमधून आपापला मोबाईल चार्ज करीत असतात, ही बाब कारागृह अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच बोर्ड बराकीच्या बाहेर करण्यात आला. तरीही कैद्यांनी हार मानली नव्हती. त्यांनी नवीन शक्कल लढवली होती. ती जीवघेणी होती. मोबाईल चार्जचा वायर कापून होल्डर पिन फेकून देत होते आणि चार्जरची वायर छताचा पंखा किंवा लाईटच्या वायरला जोडत होते. हे करताना आपल्याला विजेचा धक्का लागून मृत्यू येईल याची भीतीही त्यांना नव्हती. कारवाई होऊनही बिनधास्तपणे मोबाईलचा वापर होत होता.