कैद्यांचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला : नागपूर मध्यवर्ती कारागृहात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:52 PM2019-02-02T22:52:07+5:302019-02-02T22:53:40+5:30
हत्येच्या आरोपात कारागृहात असलेल्या दोन कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला चढवून मारहाण केली. शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वेळेसाठी कारागृहात मोठी खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हत्येच्या आरोपात कारागृहात असलेल्या दोन कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला चढवून मारहाण केली. शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही वेळेसाठी कारागृहात मोठी खळबळ उडाली होती. सागर कैलास जयस्वाल आणि रिजवान नाजीर महाजन, अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत.
सागर आणि रिजवान हे दोघेही हत्येच्या आरोपात कारागृहात बंदिस्त आहेत. नेहमीप्रमाणे आज सकाळी तुरुंगाधिकाऱ्यांनी कारागृहात राऊंड घेतला. ९.४५ वाजता बडी गोल क्रमांक १ जवळच्या कॅन्टीनमध्ये हे दोघे एकत्रपणे चर्चा करताना दिसल्याने तुरुंगाधिकारी उमेश लक्ष्मण नाईक (वय ३१) यांनी त्यांना हटकले. तुम्ही एकत्र राहू नका, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यास सांगितले. त्यावरून सागर आणि रिजवान चिडले. त्यांनी संगनमत करून नाईक यांच्यासोबत वाद घातला. त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी नाईक यांना मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली.
कारागृहातील इतर कैदी तसेच रक्षकांनी धाव घेऊन हा वाद सोडवला. त्यानंतर नाईक यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सागर तसेच रिजवानविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.