कोरोनाला रोखण्यासाठी नागपूर कारागृहातील कैदी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:53 PM2020-04-24T12:53:00+5:302020-04-24T12:53:26+5:30
कारागृहातील खतरनाक कैद्यांपैकी अनेक कैदी आता कोरोना रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोरोनाचा धोका थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती सुरू केली आहे.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारागृहातील खतरनाक कैद्यांपैकी अनेक कैदी आता कोरोना रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोरोनाचा धोका थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती सुरू केली आहे. या मास्कचा दर्जा चांगला असल्यामुळे कारागृहातील मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. विशेष म्हणजे, २३ एप्रिलपर्यंत मध्यवर्ती कारागृहाने विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच ग्रामपंचायतींना एकूण ४५ हजार मास्कचा पुरवठा केला आहे.
येथील मध्यवर्ती कारागृहात राज्यातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक खतरनाक गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. कारागृहात त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेतली जातात. कोरोनाची दहशत सर्वत्र झपाट्याने वाढल्यानंतर हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा मोठा उपयोग होतो, हे लक्षात आले. त्यानंतर ठिकठिकाणांहून मास्कची प्रचंड मागणी वाढली. परिणामी अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला. काही ठिकाणी मास्कची दामदुप्पट दराने विक्री केली जाऊ लागली. दर्जा चांगला नसतानादेखील एका मास्कसाठी ५० रुपये, ६० रुपये आणि काही ठिकाणी शंभर रुपये घेतले जात होते. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी कैद्यांकडून मास्कची निर्मिती करवून घेण्याचे ठरविले. आरंभी या मास्कचा वापर कारागृहातील समोर काम करणारे रक्षक, आणि कारागृहातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी करण्यात आला. दर्जा अतिशय चांगला असल्यामुळे पोलिसांनी हे मास्क मागितले. नंतर आरोग्य विभागाने त्याची मागणी केली. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळा, कोषागार विभाग, न्यायालय तसेच विविध विभागप्रमुख कारागृह प्रशासनाकडे मागणी नोंदवू लागले. त्यानंतर अमरावती मध्यवर्ती कारागृह, वाशिम, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या कारागृहांतून तसेच ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींतून आणि नगरपंचायतींकडूनही या मास्कला मागणी आली.
निर्मितीचा वेग वाढला
ठिकठिकाणांहून मास्कची आॅर्डर येत असल्यामुळे अधीक्षक कुमरे यांनी मास्क निर्मितीचा वेग वाढवला. त्यासाठी अनेक कुशल कैद्यांना कामी लावले. प्रारंभी दरदिवशी २०० ते ३०० नंतर ५०० आणि आता रोज २ हजार मास्क कारागृहात तयार केले जात आहेत.