कैद्यांना कारागृहातच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा
By admin | Published: June 16, 2017 02:07 AM2017-06-16T02:07:09+5:302017-06-16T02:07:09+5:30
मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना आता कारागृहातच राहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील
मेडिकलमध्ये कैद्यांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचार : राज्यातील दुसरा प्रयोग नागपुरात
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना आता कारागृहातच राहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांची वैद्यकीय सेवा मिळणार आहे. येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपचार करण्यात येणारी ‘टेलिमेडिसीन’ सुविधा सोमवारपासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत २० कैद्यांना याचा लाभ मिळाला आहे. यामुळे कैद्यांचे पळून जाण्याच्या प्रकरणांवर काही प्रमाणात अंकुश लागण्याची शक्यता आहे. शिवाय, कैद्यांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवाही मिळणार आहे.
राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत. प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात एक इस्पितळ आहे. येथे रुग्णांची प्राथमिक स्तरावर तपासणी केली जाते. मात्र आजार बळावल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते.
उपचारासाठी येणाऱ्या कैद्यांच्या दिमतीला कारागृहाचे मनुष्यबळ तसेच पोलीस यंत्रणा राबते. रुग्णालयामधून कैदी पळून जाऊ नये म्हणून २४ तास पोलिसांचा पहारा असतो. इतर रुग्णांसाठी व रुग्णालयाच्या कामकाजात याचा अडथळा होतो. यात पैसा आणि मनुष्यबळ खर्च होते. अनेक वेळा रुग्णालयांमधून कैदी पळून गेल्याच्या घटनाही घडतात. यावर उपाय म्हणून कारागृह प्रशासनाने आजारी कैद्यांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपचार करण्यात येणारी ‘टेलिमेडिसीन’ वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात २०१५ मध्ये औरंगाबाद येथून झाली तर आता हाच प्रयोग १२ जून २०१७ पासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातही सुरू झाला आहे. राज्यातील हा दुसरा प्रयोग ठरला असून लवकरच इतरही कारागृहात हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नागपूरच्या कारागृहातील
२० कैद्यांवर उपचार
नागपुरातील कारागृहात सध्याच्या स्थितीत शिक्षा झालेले आणि कच्चे असे सुमारे २२०० कैदी आहेत. उपचाराच्या निमित्ताने त्यांना वेळोवेळी मेडिकलमध्ये दाखल केले जाते. उपचारासाठी येणारे कैदी पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा नेहमीच धोका असतो. याला घेऊन राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी यासंदर्भात मेडिकलला ‘टेलिमेडिसीन’ची सुविधा सुरू करण्याबाबत एप्रिल २०१७ मध्ये पत्र पाठविले. तांत्रिक अडचणीतून मार्ग काढीत आता हा प्रकल्प सुरू झाला आहे. १२ जून ते आतापर्यंत २० रुग्णांना याचा फायदा झाला असून यात सर्वाधिक रुग्ण हे औषधवैद्यकशास्त्र विभाग व त्वचारोग विभागाचे होते.
असा आहे प्रकल्प
नागपूरचे मध्यवर्ती कारागृह व मेडिकल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात आले आहे. आजारी कैद्याला कारागृहातील इस्पितळामध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी निदान न झाल्यास तेथील डॉक्टर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधतील. त्यांना आजारी कैदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखविण्यात येईल. यावेळी आजारी कैद्याशी तज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष संवाद साधतील. त्यानंतर तुरुंगातील डॉक्टरांना उपचाराबाबत मार्गदर्शन करतील. त्यानुसार कैद्यांवर उपचार होतील. त्यामुळे आजारी कैद्यांना तुरुंगाच्या बाहेर आणावे लागणार नाही.