कैदी भेटू शकणार नाहीत कुटुंबीयांशी; नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:48 AM2020-03-19T11:48:14+5:302020-03-19T11:48:45+5:30
नागपूर कारागृह प्रशासनाने ‘अलर्ट’ जारी केला असून, बुधवारपासून कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्यावर अंकुश लावला आहे. न्यायालयात व मेडिकलला जाणाऱ्या कैद्यांना हात स्वच्छ केल्यानंतरच जेल परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.
जगदीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा फटका कारागृहातील कैद्यांनाही बसला आहे. कारागृह प्रशासनाने ‘अलर्ट’ जारी केला असून, बुधवारपासून कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्यावर अंकुश लावला आहे. न्यायालयात व मेडिकलला जाणाऱ्या कैद्यांना हात स्वच्छ केल्यानंतरच जेल परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.
नागपूरच्या कारागृहात आतंकवाद्यासह नक्षलवादीसुद्धा आहेत. कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या आहे. १८४० क्षमता असलेल्या नागपूरच्या कारागृहात २४५० कै दी वास्तव्यास आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी कारागृहाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. त्याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृह प्रशासनाला उपाययोजना करण्याचे सुचविले आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयाशी भेटण्यावर अंकुश लावला आहे. कैद्यांशी भेट घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने त्यांचे कुटुंबीय येतात. पण कोरोनाच्या भीतीपोटी कुटुंबीयांच्या भेटी थांबविण्यात आल्या आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून आणि कैद्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दररोज मोठ्या संख्येने कैदी पेशीसाठी न्यायालयात जातात. उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात येते. या दरम्यान कैदी लोकांच्या संपर्कात येतात. येथून परत आल्यानंतर कैद्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. कारागृहात ३५ बॅरेक आहे. प्रत्येक बॅरेकमध्ये कैद्यांना साबण व हॅण्डवॉश दिला आहे. कैद्यांचे कपडे, त्यांच्या चादरी धुण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. कारागृहात दर शुक्रवारी आरोग्य शिबिर लावण्यात येते. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मेडिकल व लता मंगेशकर रुग्णालयाला शिबिर लावण्याची विनंती केली आहे. कैद्यांना नियमित कोरोनापासून सावधगिरी बाळगण्याची माहिती दिली जात आहे. कैद्यांच्या नियमित संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहे. कारागृहात २० बेडचे रुग्णालय आहे. तिथे डॉक्टर व मेडिकल स्टाफला अलर्ट राहण्यास सांगितले आहे. कुठला कैदी पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यासाठी ७ विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहे.
प्रत्येक कैद्यांची होणार स्क्रिनिंग
गृहमंत्र्याच्या आदेशानुसार कारागृह प्रशासनाने बुधवारी पाच डिजिटल स्क्रिनिंग थर्मामीटरची खरेदी करण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक कैद्याची तपासणी होणार आहे. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे म्हणाले, कारागृह प्रशासन या आपत्तीला निपटण्यासाठी तयार आहे. बुधवारी प्रायोगिक तत्त्वावर ५ डिजिटल स्क्रिनिंग थर्मामीटर खरेदी करण्यात येईल. त्यानंतर स्क्रिनिंगला सुरुवात होईल. कारागृहात स्वच्छता ठेवण्यासाठी उपाय केले आहेत. कारागृहातील मेडिकल टीम २४ तास अलर्ट आहे. आजारी कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.