खासगी बस उलटली, चार ठार
By admin | Published: July 9, 2016 02:55 AM2016-07-09T02:55:25+5:302016-07-09T02:55:25+5:30
नागपूर - वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टरचा वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला.
१२ जण जखमी : टाकळघाट फाटा परिसरातील अपघात
टाकळघाट : नागपूर - वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टरचा वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला. त्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रोडच्या कडेला उलटली. यात चौघांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसचालक व वाहकाचा समावेश आहे. ही घटना एमआयडीसी (बुटीबोरी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
कोमल ज्ञानेश्वर तेलरांधे (२९, रा. केळझर, जिल्हा वर्धा), विलास मारोतराव गुळे (४०, रा. सावंगी, आसोला, जिल्हा नागपूर), बसचालक मंगेश दामोदर सालोडकर (२२, रा. पेंढरी, मध्य प्रदेश) व वाहक मारोती तुळशीराम काळबांडे (४०, रा. रामबाग, नागपूर),अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये विनोद ठाकरे (५०, रा. खापरखेडा, जिल्हा नागपूर), प्रशांत म. कृपाल (३९, रा. बेला, जिल्हा नागपूर), यज्ञेश्वर स. मोरेश्वर (४७, रा. सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा), रूपेश ह. उपाटे (२३, रा. जळगाव), विजय मा. काळे (१७, रा. धवळपेठ), शैला शेख (२४, रा. केळझर, जिल्हा वर्धा), रूपेश धकाते (३२, रा. वर्धा), विजया कै. माथरकर (१९ रा. धवळपेठ), अनिता मसराम, संगीता मतलानी, सुनील अंकुश राऊत (३०, रा. खडकी) यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे.
हे सर्वजण एमएच-३२/बी-४२२१ क्रमांकाच्या खासगी बसने वर्धेहून नागपूरला येत होते. अपघात होताच एमआयडीसी (बुटीबोरी) पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार मनीष दिवटे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व जखमींना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. चौघांचेही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. शिवाय, जखमींना बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. किरकोळ जखमींवर वेळीच उपचार करून सुटी देण्यात आली. या अपघातामुळे घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागपूर - वर्धा मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)
ट्रॅक्टरने मारला कट
बसमध्ये अंदाजे २० प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने या बसला कट मारला. त्यामुळे बसचालकाचा ताबा सुटला आणि भरधाव बस रोडच्या कडेला जाऊन उलटली. त्यात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य १२ प्रवासी जखमी झाले.