पिपळा येथील खासगी क्लिनिक सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:22+5:302021-05-05T04:14:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : बाेगस डाॅक्टर शाेधमाेहीम समितीने कारवाई करीत नागरिकांच्या आराेग्याशी खेळ करीत असलेल्या खासगी डाॅक्टरचे क्लिनिक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : बाेगस डाॅक्टर शाेधमाेहीम समितीने कारवाई करीत नागरिकांच्या आराेग्याशी खेळ करीत असलेल्या खासगी डाॅक्टरचे क्लिनिक सील केले. ही कारवाई खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाक बंगला) येथे मंगळवारी (दि. ४) दुपारी करण्यात आली. त्या डाॅक्टरला त्याची वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्याची कागदपत्रे, वैद्यकीय व्यवसाय व नाेंदणी प्रमाणपत्रासह चाैकशीसाठी बुधवारी (दि. ५) सावनेर येथील तहसील कार्यालयात बाेलावण्यात आले आहे, अशी माहिती बाेगस डाॅक्टर शाेधमाेहीम समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.
याेगराज तितरमारे, रा.नागपूर असे कारवाई करण्यात आलेल्या डाॅक्टरचे नाव आहे. ताे मागील २५ वर्षांपासून पाटणसावंगी (ता. सावनेर) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पिपळा (डाक बंगला, ता. सावनेर) येथे क्लिनिक चालवायचा. काेराेना संक्रमण काळात त्याने पिपळा (डाक बंगला) व परिसरातील काही गावांमधील नागरिकांवर उपचार करून माेठ्या प्रमाणात पैसा कमावला आहे. परंतु, काेणत्याही वैद्यकीय शाखेची पदवी अथवा पदविका तसेच महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र व नाेंदणी क्रमांक नसताना ताे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची तक्रार बाेगस डाॅक्टर शाेधमाेहीम समितीकडे करण्यात आली हाेती.
त्याअनुषंगाने समितीच्या सदस्यांनी खापरखेडा पाेलिसांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी धाड टाकून त्याच्या क्लिनिकची कसून झडती घेतली. यात सदस्यांना त्याच्या क्लिनिकच्या बाेर्डवर नाेंदणी क्रमांक व वैद्यकीय शाखेची पदवी अथवा पदविका नमूद असल्याचे तसेच आत वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले नाही. आत कागदपत्र अथवा प्रमाणपत्रांऐवजी वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे काही साहित्य आढळून आले. त्यामुळे समितीने प्रकरण तपासात ठेवत क्लिनिक सील केले आणि डाॅक्टरला वैद्यकीय शाखेची पदवी अथवा पदविका, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र, नाेंदणी क्रमांक व तत्सम कागदपत्रे घेऊन पुढील चाैकशीसाठी बुधवारी (दि. ५) सावनेर तहसील कार्यालयात हजर राहण्याची सूचना दिली आहे.
संपूर्ण कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून याेग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सतीश मसाळ यांनी दिली. ताे आवश्यक कागदपत्र घेऊन हजर न झाल्यास अथवा त्याच्याकडे ती कागदपत्रे नसल्यास त्याच्यावर फाैजदारी गुन्हा नाेंदविण्यात येणार असल्याचे संकेत समितीतील सदस्यांनी दिले. ही कारवाई समितीचे अध्यक्ष सतीश मसाळ, खंडविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत वाघ, सहायक तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. मधुकर सोनोने, खापरखेड्याचे ठाणेदार पुंडलिक भटकर, मंडळ अधिकारी होमेश्वर पवार, ग्रामसेवक रवींद्र हुसे, तुषार कुंभलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
....
आवारात जैव कचरा विखुरलेला
त्याच्या चुकीच्या औषधाेपचारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताे रुग्णांना आवारात टेबलवर झाेपवून सलाईन द्यायचा. त्यासाठी लाेखंडी खांब व टीव्ही केबल व तत्सम साहित्याचा वापर करायचा, अशी माहिती काही स्थानिक जाणकार व्यक्तींनी दिली. या क्लिनिकच्या आवारात सर्वत्र इंजेक्शनच्या सिरिंज, निडल्स, औषधांची वेस्टन, सलाइनच्या बाटल्या व इतर जैव कचरा विखुरला असल्याचे आढळून आले. हा कचरा कुणीही गाेळा अथवा जप्त केला नाही.