नागपुरात खासगी डॉक्टरांचा सोमवारी संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:58 PM2019-06-15T23:58:30+5:302019-06-15T23:59:14+5:30
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेधार्थ नागपूरसह देशभरातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) सदस्य, खासगी डॉक्टर्स सोमवारी एक दिवस कडकडीत बंद पाळणार आहेत. मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर काळ्या फिती व डोक्यावर पांढरी पट्टी बांधून सेवा देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेधार्थ नागपूरसह देशभरातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) सदस्य, खासगी डॉक्टर्स सोमवारी एक दिवस कडकडीत बंद पाळणार आहेत. मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर काळ्या फिती व डोक्यावर पांढरी पट्टी बांधून सेवा देणार आहेत.
तरुण डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी देशभरात उमटले. राज्यातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करून लक्ष वेधले. आयएमए नागपूरनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. डॉक्टरांवर वाढते हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याने सोमवारपासून ‘मार्ड’ संघटना आता आंदोलन उभे करणार आहे. नागपूर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे म्हणाले, दिल्लीच्या ‘युनियन रेसिडन्ट डॉक्टर’ने ४८ तासांच्या संपाचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. आपल्याकडे ही संघटना नाही. तसेच रुग्णाचे हित जोपसता तूर्तास तरी कामबंद आंदोलन न करता विविध आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायद्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
केवळ गंभीर रुग्णांवरच उपचार
‘आयएमए’ नागपूर शाखेने सर्व खासगी डॉक्टरांना सोमवारी सकाळी ६ पासून ते मंंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपावर जाण्याचे आवाहन आयएमचे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. कृष्णा पराते, डॉ. आनंद काटे, डॉ. दिलीप गोडे. डॉ. प्रकाश देव, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. संजय देशपांडे आदींनी केले आहे. या बंदमध्ये केवळ गंभीर रुग्णांनाच तपासण्यात यावे असेही म्हटले आहे. या संपात एक्स-रे, पॅथालॉजी सेंटरही सहभागी होणार असल्याचे डॉ. झुनझुनवाला यांनी सांगितले.