कोरोनाच्या प्रतिबंधक लसीसाठी खासगी हॉस्पिटल अनुत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 11:38 AM2020-11-28T11:38:39+5:302020-11-28T11:41:41+5:30
Nagpur News Corona कोरोनावरील प्रतिबंधक लस फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. परंतु महिना होऊनही ६४० हॉस्पिटलमधून केवळ २०० हॉस्पिटलनीच पुढाकार घेतला आहे. यामुळे प्रतिबंधक लसीला घेऊन खासगी हॉस्पिटल अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक लस फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. ही लस पहिल्या टप्प्यात हायरिस्क गटाला म्हणजे, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेडून खासगी हॉस्पिटलना लस घेणाऱ्यांची यादी मागितली जात आहे. परंतु महिना होऊनही ६४० हॉस्पिटलमधून केवळ २०० हॉस्पिटलनीच पुढाकार घेतला आहे. यामुळे प्रतिबंधक लसीला घेऊन खासगी हॉस्पिटल अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.
कोरोनावरील प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी नागपुरात सुरू आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा राज्यातील पहिला आणि दुसरा टप्पा नागपुरात पूर्ण झाला आहे. तिसरा टप्प्याची प्रतीक्षा आहे. तर ‘कोव्हिशील्ड’ चाचणीचा तिसरा टप्याला सुरूवात झाली आहे. स्वयंसेवकांना दुसरा डोजही देण्यात आला आहे. डोज देण्यात आलेल्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शासनाचे फेब्रुवारी महिन्यात प्रतिबंधात्म लसीकरणाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण होणार आहे. त्यानुसार महानगरपालिकेने नोंदणी सुरू केली आहे. शासकीयसह खासगी हॉस्पिटलना त्यांच्याकडील मनुष्यबळांची यादी मागितली आहे. परंतु ६४० हॉस्पिटलमधून २०० हॉस्पिटलनी यादी दिली आहे. उर्वरीत हॉस्पिटलना मनपाने स्मरण पत्रही देण्यात आले आहे. परंतु अद्यापही यादी मिळाली नसल्याची माहिती आहे.
-१६५०० डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची यादी
डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, रुग्णवाहिका कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी व आशा वर्कर आदींना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. सध्या मनपाकडे खासगी हॉस्पिटलमधील ११०००, मेयो व मेडिकलमिळून ४००० तर महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधून १५०० अशी एकूण १६५०० लोकांची यादी प्राप्त झाली आहे.
-शीतगृहाचा आढावा लवकरच
कोरोनाची प्रतिबंधक लस येणार असली तरी ती कोणती असणार, त्यासाठी लागणारे शीतगृह कसे असणार, याची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यानुसार त्याचे नियोजन केले जाईल. खासगी हॉस्पिटलमध्ये लस घेणाऱ्यांचा यादीचा पाठपुरावा केला जात आहे.
-जलज शर्मा
अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका