खासगी रुग्णालयांच्या मुसक्या आवळणार : कोविड रुग्णांची माहिती सादर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:00 PM2021-05-12T23:00:53+5:302021-05-12T23:03:26+5:30
Private hospitals to be controle: महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना मार्च आणि एप्रिल, २०२१ मध्ये ८० टक्के खाटांमध्ये आणि २० टक्के खाटांमध्ये किती कोविड रुग्णांना दाखल केले आणि त्यांच्याकडून कोणत्या दराने शुल्क घेतले याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना मार्च आणि एप्रिल, २०२१ मध्ये ८० टक्के खाटांमध्ये आणि २० टक्के खाटांमध्ये किती कोविड रुग्णांना दाखल केले आणि त्यांच्याकडून कोणत्या दराने शुल्क घेतले याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत.
कोविड बाधित रुग्णांच्या सतत तक्रारी असल्याने अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी बुधवारी वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेऊन सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस देण्याचे निर्देश दिले.
सर्वाधिक तक्रारी २० टक्के खाटांबाबत आहेत. रुग्णालयांकडून जास्त दर आकारले जात आहेत. महाराष्ट्र शासनाने ८० टक्के खाटांवर दर निर्धारित केले आहेत. या दरांबाबत नागरिकांच्या तक्रारी कमी आहेत. मनपाकडून मेडिकल बिलाची पूर्व तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नियुक्ती केली आहे. प्रत्येक १५ दिवसांनी त्यांची बदली दुसऱ्या रुग्णालयात केली जाते.
शर्मा यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी ८० टक्के खाटांवर आणि २० टक्के खाटांवर किती कोविड रुग्णांना दाखल केले आणि त्यांच्याकडून आकारलेल्या दरांची माहिती मागितली आहे. सर्व खासगी रुग्णालयांना ८० टक्के आणि २० टक्के खाटांची माहिती देण्यासाठी सूचनाफलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये शासनाव्दारे निर्धारित दरांची सुध्दा माहिती असेल. ऑडिटरचे नांव व मोबाईल क्रमांक तसेच तक्रार नोंदविण्याकरिता कंट्रोल रूमचा नंबरसुद्धा सूचनाफलकावर लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही याबाबत निर्देश दिले होते. रुग्णालयांनी निर्देशांचे पालन केले नाही तर त्यांना दंड करण्यात येईल, असा इशारा जलज शर्मा यांनी दिला आहे.