खासगी रुग्णालये होणार ऑक्सिजन बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:56+5:302021-05-06T04:07:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्टची स्थापना करण्यासाठी आता एमएसएमई-विकास संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्टची स्थापना करण्यासाठी आता एमएसएमई-विकास संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात येणार आहे. हे प्लान्ट स्थापन करण्यासाठी क्लस्टर योजनेंतर्गत रुग्णालयांना सहकार्य करण्यात येईल. नागपुरातील जी खासगी रुग्णालये समान सुविधा केंद्राकडून सेवा देण्यास सक्षम होतील ती नागपुरात ‘ऑक्सिजन बँक’ म्हणून काम करतील, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. पी. एम. पार्लेवार यांनी दिली आहे. ऑक्सिजन प्लान्टच्या मुद्यावरून विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांची बैठक झाली.
नागपूरच्या विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन या संघटनेमध्ये १०० हून अधिक खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींबाबत या बैठकीत चर्चा झाली. क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत ऑक्सिजन प्लान्टचे समान सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबतदेखील विचार झाला. दहा कोटी रुपये किमतीच्या ऑक्सिजन प्लान्टद्वारे सुमारे १ हजार ७०० सिलेंडर ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो. यासाठी विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याची तसेच प्रकल्पासाठी खासगी रुग्णालयांमार्फत १० ते ३० टक्के योगदान तयारी दाखविली. उर्वरित ७० टक्के रक्कम केंद्रीय सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे समान सुविधा केंद्राला अनुदान म्हणून प्रदान करण्यात येईल. या योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल व तातडीने मंत्रालयाकडे सादर केला जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीला डॉ. अशिक बराडे, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. मुकुंद ठाकूर, डॉ. श्रीकांत मुकेवार, डॉ. प्रमोद गिरी, डॉ. आलोक उमरे, डॉ. अनुप मरार, डॉ. संतोष ढोले, चेतन गुप्ता, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. पंकज हरकुत हे प्रामुख्याने उपस्थित होते.