नागपूर-मुंबईदरम्यान आता लवकरच धावणार खासगी रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 08:36 AM2020-07-06T08:36:07+5:302020-07-06T08:36:34+5:30
मुंबई-१ क्लस्टर अंतर्गत नागपूर आणि मुंबईदरम्यान दोन जोडी खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
आनंद शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारने ज्या मार्गावर खासगी क्षेत्राला रेल्वेचे परिचालन करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये नागपूर-मुंबई मार्गाचा समावेश आहे. याशिवाय अकोला-मुंबई मार्गावर खासगी संस्थांना रेल्वे चालविण्याचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव आहे.
खासगी रेल्वे चालविण्यासाठी रेल्वेतर्फे खासगी संस्थांकडून मागविण्यात आलेल्या आवेदनातून संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमा करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२० निश्चित केली आहे. त्यानंतर ६० दिवसात खासगी कंपन्यांची यादी तयार करण्यात येईल आणि नंतर बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खासगी रेल्वे रुळावर धावतील.
रेल्वे मंत्रालयाने देशातील १२ क्लस्टर अंतर्गत २२४ खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या बोलीसाठी रेल्वे आवेदन (आरएफक्यू) मागितले आहेत. या रेल्वेपैकी मुंबई-१ क्लस्टर अंतर्गत नागपूर आणि मुंबईदरम्यान दोन जोडी खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी रेल्वे चालविण्याबाबत जारी केलेल्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार मुंबई-नागपूर खासगी रेल्वे गुरुवारी मुंबईहून रवाना होऊन ८२० किमीचे अंतर कापून १०.३० तासात गुरुवारीच नागपुरात पोहोचेल. याचप्रकारे नागपूर-मुंबई खासगी रेल्वे गुरुवारी मुंबईकडे रवाना होऊन ११.०५ तासात शुक्रवारी मुंबईला पोहोचेल. या दोन्ही रेल्वे आठवड्यात सहा दिवस धावतील.
एक अन्य खासगी रेल्वे मुंबई-नागपूरदरम्यान धावेल. यामध्ये मुंबई-नागपूर खासगी रेल्वे बुधवारी मुंबईहून रवाना होऊन १०.२० तासात बुधवारीच नागपुरात येईल तर नागपूर-मुंबई खासगी रेल्वे गुरुवारी नागपुरातून निघून १०.३५ तासात शुक्रवारी मुंबईला पोहोचेल. या दोन्ही रेल्वे आठवड्यात केवळ एक दिवस धावणार आहे. परंतु या खासगी रेल्वे रुळावर धावण्यासाठी सध्या वेळ आहे.
अकोला-मुंबईकरिता खासगी रेल्वे
विदर्भातील अकोला आणि मुंबईदरम्यान एक जोडी रेल्वे धावणार आहे. यामध्ये मुुंबई-अकोला खासगी रेल्वे मुंबईहून मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रवाना होऊन १४.३० तासात बुधवार, शनिवार आणि सोमवारी अकोल्यात येईल. याचप्रकारे अकोला-मुंबई खासगी रेल्वे बुधवार, शनिवार आणि सोमवारी अकोल्याहून निघून १३.५० तासात मंगळवार, गुरुवार आणि रविवारी मुंबईला पोहोचेल.
सांकेतिक प्रकल्पात २३३० कोटींची गुंतवणूक
२२४ खासगी रेल्वे चालविण्यासाठी भारतीय रेल्वेला १२ क्लस्टरमध्ये विभाजित केले आहे. यामध्ये मुंबई-१ क्लस्टर अंतर्गत १६ खासगी रेल्वे चालविण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर आणि अकोल्याच्या रेल्वेचा समावेश आहे. या सर्व रेल्वे चालविण्यासाठी रेल्वेने २३३० कोटींची गुंतवणूक सांकेतिक प्रकल्पात निश्चित केली आहे. या रेल्वे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) आणि डिझाईन, बिल्ड, फायनान्स आणि आॅपरेट (डीबीएफओ) तत्त्वावर खासगी संस्थांतर्फे चालविण्यात येणार आहे.