खासगी प्रवास महागला, ३० टक्के भाडेवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:03+5:302021-08-18T04:13:03+5:30
सौरभ ढोरे काटोल : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशात आता विशेष वाहनाने प्रवास करायचा असेल तर ...
सौरभ ढोरे
काटोल : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशात आता विशेष वाहनाने प्रवास करायचा असेल तर पूर्वीपेक्षा ३० टक्के भाडे माेजावे लागत आहे.
पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि वाहतूकदारही अडचणीत आले आहेत. यामुळे त्यांनी आता किलोमीटरमागे ४ रुपयांची भाडेवाढ केली आहे. पूर्वी खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी किलोमीटरमागे १० रुपये भाडे आकारले जायचे. आता यासाठी १४ ते १५ रुपये इतका दर आकारला जात आहे.
गत सहा महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दराचा ग्राफ चढतीवर आहे. त्यामुळे गाडीचे हप्ते आणि लॉकडाऊन काळात बुडालेला व्यवसाय पुन्हा सावरण्यासाठी वाहतूक क्षेत्रात भाडेवाढ करण्याशिवाय चालक व मालकांना पर्याय राहिला नाही. याचा थेट फटका मात्र प्रवाशांना बसणार आहे. १० ते १२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपचे पूर्वी प्रति किलोमीटर १० रुपये भाडे आकारले जायचे. मात्र हे भाडे आता १४ ते १५ रुपये प्रति किलोमीटर इतके आकारले जात आहे.
गाडीचा हप्ता कसा भरणार?
अनेकांनी कर्ज काढून वाहन खरेदी केलेले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक दिवस वाहन चालकांना व्यवसाय मिळाला नाही. तेव्हा कर्जाचा हप्ता भरणे वाहन चालकांसाठी अवघड झाले होते. आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले आहेत. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढविल्याने वाहन चालविणे परवडत नाही. त्यामुळे वाहनाचा हप्ता कसा भरावा, असा प्रश्न वाहन मालकांकडून उपस्थित होत आहे.
--
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने प्रवासी वाहने चालविणे अवघड झाले आहे. दूरच्या प्रवासासाठी गाडी भाड्याने नेण्यासाठी प्रवाशांना १३ ते १४ रुपये जास्त वाटतात. परंतु डिझेलचे दरच एवढे वाढलेले आहेत की गाडी रोडवर आणणे परवडत नाही.
नंदकिशोर पुसदेकर
वाहनचालक
--
पूर्वीपेक्षा आता काही प्रमाणात भाडेवाढ झालेली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेता ही भाडेवाढ सर्वत्रच आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेल ९० च्या जवळजवळ पोहचले आहे. त्यामुळे चालक-मालकांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
वैभव गजभिये
खासगी वाहनचालक
---
मी खासगी प्रवासी वाहतूक करतो. इंधन दरवाढीनंतर खासगी वाहनांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. या भाडेवाढीचा थेट फटका मात्र सामान्य प्रवाशाला बसतो आहे.
उमाकांत येडमे, प्रवासी, काटोल