खासगी ट्रॅव्हल्सची वाढू शकते मनमानी!
By admin | Published: October 30, 2015 02:54 AM2015-10-30T02:54:18+5:302015-10-30T02:54:18+5:30
सुट्यांचा हंगाम आला की रेल्वेचे बुकिंग फुल्ल होते. त्यातच एसटीची सेवाही काहीशी अपूर्णच...
दिवाळीनिमित्त तिकिटांचा दर वाढण्याची शक्यता
नागपूर : सुट्यांचा हंगाम आला की रेल्वेचे बुकिंग फुल्ल होते. त्यातच एसटीची सेवाही काहीशी अपूर्णच... यामुळे खासगी बसशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, अशा ऐन हंगामात अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत प्रवाशांना लुटण्याचा प्रकार अनेक ट्रॅव्हल्स कंपन्याकडून सर्रास होतात. या वर्षीही दिवाळी सुट्यांचा फायदा घेण्यासाठी काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या तयारी करीत असल्याचे वास्तव आहे.
‘लोकमत’च्या चमूने गुरुवारी अमरावती रोड, बैद्यनाथ चौक, गणेशपेठ बसस्थानकावरील काही ट्रॅव्हल्सच्या कार्यालयांना भेटी दिल्या असता, दिवाळीलगत असलेल्या दिवसांमध्ये तिकिटांचा दरात दुपटीने वाढ होण्याचे संकेत तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळाले.
बैद्यनाथ चौक
बैद्यनाथ चौकातील एका मोठ्या ट्रॅव्हल्स कार्यालयात चमू पोहचली. तेथील महिला कर्मचाऱ्याला ८ नोव्हेंबरसाठी नागपूर-इंदोर प्रवासाच्या वातानुकूलित (एसी) स्लीपर तिकीटाचे दर विचारल्यावर आज बुक केल्यावर १२०० दर लागल्याचे सांगून पुढील काही दिवसांत यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली. नॉन एसी बसचे दर ७५० रुपये सांगितले.
याच चौकातील दुसऱ्या ट्रॅव्हल्स कार्यालयात चमू गेल्यावर तेथील किशोर नावाच्या कर्मचाऱ्याने नागपूर-नांदेड प्रवासाच्या दिवाळीच्या तीन दिवसांपूर्वीपर्यंतच्या तिकीट एसी बससाठी ७४० तर नॉन एसीसाठी ६३० रुपये दर सांगितले. परंतु हेच दर ८ नोव्हेंबरपर्यंत १००० तर १२०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यताही वर्तवली. (प्रतिनिधी)
गणेशपेठ चौक
गणेशपेठ चौक येथील एका ट्रॅव्हल्स कार्यालयातील बुकिंग कर्मचाऱ्याने इंदोरसाठी नॉन-एसी बसचे भाडे आजच्या स्थितीत ५०० रुपये सांगितले, परंतु दोन दिवसानंतर यात वाढ होण्याची माहितीही दिली. याच भागातील दुसऱ्या ट्रॅव्हल्स कार्यालयातील कर्मचाऱ्याने नागपूर-पुणे प्रवास भाड्याचे दर ८०० रुपये सांगितले, परंतु ९ नोव्हेंबर तारखेचे बुकिंग मागितल्यावर त्याने नवीन दरपत्रकाचा चार्टच समोर केला.