विमानतळाच्या खासगीकरणाला मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:55+5:302020-12-06T04:09:55+5:30
श्रेयस होले नागपूर : देशातील सर्वात जुन्या असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाला या महिन्यात गती मिळणार आहे. ...
श्रेयस होले
नागपूर : देशातील सर्वात जुन्या असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाला या महिन्यात गती मिळणार आहे. प्रायव्हेट पार्टनर शोधण्यासाठी डिसेंबर महिन्यातच कन्सलटंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. शासन अनेक वर्षांपासून प्रायव्हेट पार्टनर शोधण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय विमानतळ असूनही येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.
देशाच्या इतर विमानतळांच्या तुलनेत येथे अनेक सुविधांचा अभाव आहे. विमानतळाचा झपाट्याने विकास करण्यासाठी प्रदीर्घ कालावधीपासून खासगीकरणाचा विचार करण्यात येत आहे. परंतु अनेक कारणांमुळे खासगीकरणाची प्रक्रिया खोळंबली आहे. आता या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया या महिन्यात गती घेणार आहे. प्रायव्हेट पार्टनर शोधण्यासाठी कन्सलटंटची नियुक्ती डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रुही म्हणाले की, या महिन्यात कन्सलटंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे खासगीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. कन्सलटंट निविदेचे कागदपत्र तयार करण्यास आणि प्रायव्हेट पार्टनर शोधण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाची मदत करणार आहे. त्यानंतर लवकरच विमानतळाचे खासगीकरण होणार आहे. कोरोनामुळे या वर्षी विमानतळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे विमानतळाच्या विकासावर त्याचा परिणाम झाला. निधीचा तुटवडा असल्यामुळे विमानतळ प्रशासन अतिमहत्वाची कामे करीत आहेत. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी विमान प्रवाशांची संख्या घटली नाही ही महत्वाची बाब आहे. आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेवर कोरोनाचा परिणाम होईल काय ? या प्रश्नावर त्यांनी खासगीकरणाच्या प्रक्रियेवर कोरोनाचा प्रभाव पडणार नसल्याची माहिती दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे मागील वर्षी जीएमआरने विमानतळ संचालनासाठी अंतिम बोली लावली होती. विमानतळ जीएमआरच्या हातात जाणार असल्याचे मानण्यात येत होते. परंतु त्यानंतर जीएमआरची बोली रद्द करण्यात आली.
...........