सुनील केदारांविरोधात विधानसभेत हक्कभंग मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 09:11 PM2021-06-15T21:11:48+5:302021-06-15T21:13:01+5:30
Sunil Kedar, Privillage motion राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार टेकचंद सावरकर व जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यात खुर्चीवरून झालेल्या कलगीतुऱ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सुनील केदार यांनी माझा नव्हे तर पाच लाख मतदारांचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग मांडू, असा इशारा सावरकर यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार टेकचंद सावरकर व जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यात खुर्चीवरून झालेल्या कलगीतुऱ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सुनील केदार यांनी माझा नव्हे तर पाच लाख मतदारांचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग मांडू, असा इशारा सावरकर यांनी दिला. तर दुसरीकडे भोयर यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत सावरकर यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
कामठी येथे झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत शिष्टाचारानुसार बसण्यासाठी खुर्ची नसल्याच्या मुद्यावरून सावरकर यांनी आक्षेप घेतला होता व त्यानंतर भोयर यांच्यासमवेत त्यांचा शाब्दिक वाद झाला. या मुद्यावर दोघांनीही मंगळवारी पत्रपरिषद घेत स्वत:ची भूमिका मांडली. सुनील केदार हे राज्याचे मंत्री असले तरी ते आमदारांसमवेत दुजाभाव करताना दिसून येतात. सोमवारीदेखील केदार यांनी सार्वजनिक मंचावरून अयोग्य भाषा वापरली व अपमान केला. अंगावर धावून जाणे एका मंत्र्याला निश्चितच शोभत नाही. मुळात पालकमंत्री केदार आहेत की नितीन राऊत, हेच लक्षात येत नाही. राऊत यांच्या अधिकारातील बैठकी केदार घेतात व त्यातून काँग्रेसचा प्रचार करतात, असा आरोप सावरकर यांनी लावला.
उशिरा येऊन सावरकरांची अरेरावी : भोयर
दरम्यान, सुरेश भोयर यांनी सावरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. सावरकर हे एकतर बैठकीला उशिरा आले. त्यानंतर त्यांनी केदार यांच्याकडे दिलगिरीदेखील व्यक्त केली नाही. ते गोंधळ घालण्याच्या उद्देशानेच बैठकीला आले होते. कुठल्याही संवैधानिक पदाचा अपमान करणे, ही काँग्रेसची संस्कृती नाही. सावरकर यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भोयर यांनी लावला.