प्रियंका गांधी सेवाग्रामला येणार ? विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:42 PM2019-02-07T22:42:04+5:302019-02-07T22:43:14+5:30
शहर कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीचे दर्शन कॉंग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोरदेखील झाले. दोन्ही गटाच्या नेत्यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यात काही जणांना यश आले. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रियंका गांधी यांना सेवाग्राममध्ये येण्याचे निमंत्रण दिले. प्रियंका यांनीदेखील लवकरच येऊ, असे आश्वासन दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र पक्षात नवी ऊर्जा निर्माण होत असताना शहरातील गटबाजीला पूर्णविराम मिळणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीचे दर्शन कॉंग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोरदेखील झाले. दोन्ही गटाच्या नेत्यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यात काही जणांना यश आले. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रियंका गांधी यांना सेवाग्राममध्ये येण्याचे निमंत्रण दिले. प्रियंका यांनीदेखील लवकरच येऊ, असे आश्वासन दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र पक्षात नवी ऊर्जा निर्माण होत असताना शहरातील गटबाजीला पूर्णविराम मिळणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
प्रियंका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी शहर कॉंग्रेससोबतच असंतुष्ट गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवारीच दिल्लीत पोहोचले. बुधवारी प्रियंका यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी देशभरातील पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीतदेखील ३ वाजताच्या सुमारास मुत्तेमवार-ठाकरे गटाने प्रियांका गांधी यांची भेट घेतली. प्रियांका गांधी यांना नागपूर व सेवाग्रामला भेट द्यावी, असे निमंत्रण यावेळी देण्यात आले. शहरात राबवण्यात येत असलेले भाजपचे पोलखोल अभियान, बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण व इतर कार्यक्रमाची माहिती गांधी यांना अत्यल्प वेळात दिल्याचा दावाही कार्यकर्त्यांनी केला. यावेळी उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, शेख हुसेन, अतुल लोंढे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, औवेसी कादरी, रमण पैगवार, संजय महाकाळकर, मनोज सांगोळे, संदीप सहारे, विवेक निकोसे, रमेश पुणेकर, मिलिंद सोनटक्के, पंकज लोणारे, महेश श्रीवास, राजेश पौनीकर, संदीप देशपांडे आदींचा समावेश होता.
विदर्भ दौऱ्यावरच या
दुसरीकडे काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत व पक्षातून काढण्यात आलेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह असंतुष्ट गटातील पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील कॉंग्रेस मुख्यालयात होते. माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार अशोक धवड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. यात काहीच कार्यकर्त्यांना प्रियंका यांचे प्रत्यक्ष अभिनंदन करण्याची संधी मिळाली. प्रियंका गांधी यांनी विदर्भाच्या दौऱ्यावरच यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली. या गटाने महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खडगे यांचीदेखील भेट घेतली. यावेळी नरु जिचकार, कृष्णकुमार पांडे, यादवराव श्रीपूरकर, फिलिप्स जैस्वाल, ठाकूर जग्यासी, महिला कॉंग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस महासचिव कांता पराते, दिनेश यादव, दीपक खोब्रागडे यांच्यासह १५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.