प्रियंकाला मिळाला न्यायाधीश होण्याचा बहुमान
By admin | Published: April 17, 2017 02:13 AM2017-04-17T02:13:25+5:302017-04-17T02:13:25+5:30
घरी चार महिन्यांचा तान्हुला आणि तीन वर्षांची चिमुकली. एकीकडे एमपीएससीच्या परीक्षेचा ताण 1
उमरेडमधील पहिली महिला न्यायाधीश : एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून अठरावी
अभय लांजेवार उमरेड
घरी चार महिन्यांचा तान्हुला आणि तीन वर्षांची चिमुकली. एकीकडे एमपीएससीच्या परीक्षेचा ताण तर दुसरीकडे दोन्ही मुलांचा सांभाळ आणि घरसंसार! अशाही परिस्थितीत ‘ती’ जिद्दीला भिडली. चिकाटीने तासन्तास अभ्यास केला. प्रत्येक परीक्षेला सामोरे गेली आणि तिला चक्क न्यायाधीश म्हणून रिकमेन्डेशन मिळाले. कुटुंबीयांच्या आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. उमरेड परिसरातून एक महिला न्यायाधीश म्हणून पहिला बहुमान प्रियंका राजीव भोंबे हिला मिळाला. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात प्रियंकाने महाराष्ट्रातून अठराव्या स्थानी झेप घेत हे घवघवीत सुयश संपादन केले, हे येथे विशेष.
उमरेडच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवणारी अभिमानास्पद बाब ठरल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रियंकाने एमपीएससीच्या माध्यमातून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी)ची परीक्षा उत्तीर्ण केली. पूर्वाश्रमीची प्रियंका अंबालाल पटेल हिने जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथून एलएलबीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम आटोपल्यानंतर स्वत:ची खासगी तालीम सोबतच अॅड. संजय खानोरकर यांच्याकडे मदतनीस म्हणूनही प्रियंकाने कामकाज पाहिले. उमरेड तालुक्यातील उदासा येथील अॅड. राजीव भोंबे यांच्याशी प्रियंका साडेचार वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाल्या.
आणि पक्के ठरले
मागील वर्षी सन २०१६ ला मुलगा ‘दक्षेस’ हा केवळ चार महिन्यांचा होता. सातत्याने नऊ वर्षे अॅडव्होकेट म्हणून कामकाज
बघितल्यानंतर अचानकपणे काही महिने या कामकाजाला थांबा मिळणार असल्याची खंत सलत होती. काय करायचे असा प्रश्न सतावत असतानाच न्यायाधीशपदाच्या जागा निघाल्या. झाले, पक्के ठरले. आपण ही परीक्षा द्यायचीच! होती नव्हती पुस्तकांची पाने चाळली. कधी दोन तास, कधी चार तर कधी तासन्तास अभ्यास सुरू केला. एकूण तीन टप्प्यात झालेल्या या परीक्षेत प्रियंकाने बाजी मारली.
आई, पती आणि ‘ती’
दोन्ही मुलांचा सांभाळ करीत एमपीएससीची परीक्षा हीच कठीण परीक्षा होती. अशातही प्रियंकाची आई इंदिराबेन यांनी उत्तमरीत्या ही कसरत सांभाळली. पती अॅड. राजीव भोंबे यांनी वेळोवेळी हिंमत दिली. अभ्यासातील बारकावे सांगितले. मार्गदर्शन केले. वडील अंबालाल यांनीही सहकार्य दिले. याशिवाय तीन वर्षांची चिमुकली ‘निष्ठा’ हिनेही समजूतदारपणा दाखवित प्रियंकाला मदतच केली. तासन्तास वाचनालयात अभ्यासासाठी जावे लागत होते. जात असताना मुले झोपलेली. परत आल्यानंतरही मुले झोपलेलीच! अनेकदा हा प्रसंग अंगावर काटा आणणारा तेवढाच जिव्हारी लागणारा होता. ‘तुला आम्ही त्रास देणार नाही. तू घरीच अभ्यास करीत जा’ हे बोबडे बोल आहेत, ‘निष्ठा’ या चिमुकलीचे. तेव्हा मन हळवं होत होतं. बोचत होतं. तिच्या शब्दात ताकद होती. हिमंत होती. आत्मविश्वास ढळू न देता ठरवलं. आता परीक्षा जिंकायचीच!
सोईसुविधा अपुऱ्याच !
यूपीएससी असो अथवा एमपीएससीची परीक्षा यामध्ये विदर्भातील निकालाची टक्केवारी फारच कमी आहे. त्यातही ग्रामीण भागात फारशा सोईसुविधा नाहीत. अभ्यासतंत्रही अवगत नसल्याने येथील विद्यार्थी अक्षरश: भितात. खचून जातात. पात्रता असूनही अपयशी ठरतात, असे एका प्रश्नाच्या उत्तरात प्रियंका म्हणाली. तालुकापातळीवर या अभ्याक्रमांच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले पाहिजे, असेही ती बोलली. उमरेड येथील अनुभव वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची भरपूर मदत मिळाल्याचेही तिने सांगितले.